खतांच्या विशिष्ट ग्रेड व कंपनीचाआग्रह न धरण्याचे जिल्हा कृषी अधीक्षकांचे शेतक-यांना आवाहन
उस्मानाबाद,दि.15(जिमाका):- खरीप हंगाम 2022 साठी राज्यस्तरावरुन उस्मानाबाद जिल्हयास रासायनिक खतांचे 75270 मे.टन आवंटन प्राप्त आहे. यावर्षी युरिया मध्ये 18130 मे.टन, डीएपी मध्ये 18700 मे.टन, सिंगल सुपर फॉस्फेट 7980 मे.टन, म्युरेट ऑफ पोटॅशमध्ये 3190 मे.टन असे आवंटन प्राप्त आहे. विविध संयुक्त NPK खतांमध्ये 27090 मे.टन आवंटन आहे आयुक्तालयाकडून महिनानिहाय प्राप्त आवंटनाप्रमाणे खताचा पुरवठा सुरु आहे. त्यामुळे रासायनिक खते उपलब्ध नाहीत. अशा स्वरुपाच्या अफवावर शेतकऱ्यांनी विश्वास ठेवू नये.
आवंटनाशिवाय PDM पोटॅश देखील बाजारात उपलब्ध आहे. म्युरेट ऑफ पोटॅश साठी हा एक पर्याय आहे. बाजारात युरिया व सिंगल सुपर फॉस्फेटची कमतरता नाही. याशिवाय युरियाचा लक्षांकानूसार पर्याप्त संरक्षित साठा करण्यात आलेला आहे. जिल्हा परिषद यंत्रणा पुरवठा नियंत्रण करते आहे. शेतक-यांनी विशिष्ट कंपनीचे अथवा ग्रेडच्या खताचा आग्रह धरु नये.
आपल्याकडे उपलब्ध खतांमधून खताच्या मात्रा तयार करता येवून पिकाला शिफारसीप्रमाणे खत देता येते. राज्य कृषी विभागाचे यंत्रणेकडून गावोगावी अशी मिश्र खते तयार करण्याची प्रात्यक्षिके घेतली जात आहेत. एखादे NPK ग्रेड चे खत त्वरित उपलब्ध नसेल तर घाबरुन जाण्याचे कारण नाही. युरिया, सिंगल सुपर फॉस्फेट, PDM वा म्युरेट ऑफ पोटॅश अशी तीन सरळ खते उपलब्ध असली तर कोणत्याही ग्रेडचे NPK खत घरच्या घरी तयार करता येवू शकते.
एखाद्या ग्रेडचे 50 किलो खत तयार करण्यासाठी आवश्यक सरळ खते यांचे प्रमाण सोबत तक्यात दिले आहे.आपले कृषी सहाय्यक यांचेकडून मिश्र खते घरच्या घरी तयार करण्याचे मार्गदर्शन अगदी फोन वर देखील होते आहे. त्यामुळे आमचा शेतकरी हा घरच्या घरी मिश्र खत तयार करणारा उत्पादक आहे एवढी त्यांची क्षमता आहे. रासायनिक खते खरेदी करताना ती अधिकृत किरकोळ विक्रेत्या कडून पॉस मशीन वरुनच व खरेदी च्या पक्कया पावतीसह खरेदी करावे. आपल्या भागात कोणा किरकोळ विक्रेत्याकडे कोणत्या प्रकारचे किती खत आहे हे osmanabadsao.blogspot.com या ब्लॉग मधून जाणून घ्यावे. काही तक्रार असेल तर स्थानिक पंचायत समिती, तालुका कृषी अधिकारी कार्यालया यांचेकडे रीतसर तक्रार नोंदवावी. शेतक-यांच्या तक्रारीसाठी राज्यात 1800 2334 000 हा टोल फ्री क्रमांक आहे. तक्रार नोंदविण्यासाठी जिल्हया करीता 024472223794 व 9405046701 हा क्रमांक उपलब्ध करुन देण्यात आलेला आहे.