सिंगल युज प्लास्टिक पिशव्यांची विक्री व वापर करणार्‍यांवर उस्मानाबाद नगर परिषद प्रशासनाची धडक मोहीम

0

सिंगल युज प्लास्टिक पिशव्यांची विक्री व वापर करणार्‍यांवर  उस्मानाबाद नगर परिषद प्रशासनाची धडक मोहीम

उस्मानाबाद शहरातील 2 व्यापार्‍यांवर कारवाई; प्रत्येकी 5 हजाराचा दंड वसूल

केंद्र शासनाच्या आदेशानुसार सिंगल युज प्लास्टिकची विक्री आणि वापर करणार्‍यांविरुद्ध उस्मानाबाद नगर परिषद प्रशासनाने धडक मोहीम हाती घेतली आहे. प्लास्टिक पिशव्यांची विक्री आणि  वापर करणार्‍या व्यापार्‍यांवर कारवाई करण्यात येत असून मंगळवार, दि. 12 जुलै 2022 रोजी उस्मानाबाद शहरातील दोन व्यापार्‍यांना प्रत्येकी पाच हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे, अशी माहिती मुख्याधिकारी तथा प्रशासक हरिकल्याण येलगट्टे यांनी दिली.

सिंगल युज प्लास्टिकमुळे मोठ्या प्रमाणात निर्माण होणारा कचरा आणि पर्यावरणाची होणारी हानी लक्षात घेऊनकेंद्र सरकारच्या आदेशानुसार 1 जुलै 2022 पासून देशभरात सिंगल यूज प्लास्टिकवर बंदी घालण्यात आलेली आहे. या आदेशाअंतर्गत प्लास्टिकपासून बनवलेल्या अनेक वस्तूचे उत्पादन, विक्री बंद करण्यात आलेली आहे. तरी देखील बाजारामध्ये व्यापारी, विक्रेते प्लास्टिक पिशव्यांचा वस्तूंचे वहन करण्यासाठी वापर करत असल्याचे निदर्शनास आले. त्यावरुन उस्मानाबाद नगर परिषदेमार्फत प्लास्टिक पिशव्यांचा वापर न करण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे. परंतु काही व्यापारी प्लास्टिक पिशव्यांचा वापर करत असल्यामुळे मंगळवारी नगर परिषदेच्या पथकाने शहरातील व्यापार्‍यांवर कारवाई सुरु केली. प्लास्टिक पिशव्यांचा वापर करणार्‍या एका स्वीट मार्टचालक आणि किराणा दुकानदाराकडून प्रत्येकी पाच हजार रुपयाचा दंड वसूल करण्यात आला आहे.दिवसभरात अनेक व्यापार्‍यांना भेटी देण्यात आल्या. यापुढेही  सदरील कार्यवाही सुरुच राहणार आहे.

नगर परिषदेचे स्वच्छता निरीक्षक एस.बी. कांबळे, शहर समन्वयक बी. एस. पडवळ, गोरख रणखांब, राजाभाऊ पवार, स्वराज जानराव, वाहनचालक दिगंबर डुकरे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

शहरात कचर्‍याची समस्या मोठ्या प्रमाणात असून प्लास्टिक पिशव्या आणि बाटल्यांमुळे नाली तुंबून रस्त्यावर पाणी येऊन दुर्गंधी पसरण्याचे प्रकार घडतात. सिंगल युज प्लास्टिकचा पुनर्वापर होत नसल्यामुळे ते जमिनीची आणि पर्यावरणाची हानी करते. म्हणून सिंगल युज प्लास्टिकवर केंद्र शासनाने 1 जुलै 2022 पासून बंदी आणलेली आहे. त्यामुळे सिंगल युज प्लास्टिकचा वापर न करण्याचे आवाहन उस्मानाबाद नगर परिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक हरिकल्याण येलगट्टे यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top