सहावी ते नववीच्या विद्यार्थ्यांसाठी टपाल खात्यातर्फे ‘फिलाटेली स्कॉलरशिप’
उस्मानाबाद,दि.20(जिमाका):- भारतीय टपाल खात्यातर्फे सहावी ते नववीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘दीनदयाळ स्पर्श योजना’ या नावाने फिलाटेली स्कॉलरशिप सुरु केली आहे. या शिष्यवृत्तीसाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यास वार्षिक सहा हजार रुपये दिले जाणार आहेत .यासाठी 1 ते 31 ऑगस्ट 2022 या कालावधीत अर्ज करावयाचे आहेत . या शिष्यवृतिमागे विद्यार्थ्यांमध्ये टपाल तिकिटे जमविणे आणि तिकिटांचे संशोधन करणे हा छंद निर्माण करण्याचा टपाल खात्याचा मानस आहे. ज्या विद्यार्थ्यांनी हा छंद जोपासला आहे, अशा विद्यार्थ्यांची टपाल खात्यातर्फे ‘फिलाटेली प्रश्नमंजुषा आणि फिलाटेली प्रकल्प’ या आधारावर मुख्य पोस्टमास्तर जनरल, महाराष्ट्र सर्कल, मुंबई जी पी ओ, मुंबई-400001 कार्यालयातर्फे निवड केली जाईल आणि निवड झालेल्या विध्यार्थ्यांना वार्षिक सहा हजार रुपयांची शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी या कार्यालयाचा दुरध्वनी क्र. 02382-249954 वर संपर्क साधावा.
या स्कॉलरशिपसाठी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदवावा, असे आवाहन लातूर मुख्यालयातील उस्मानाबाद विभागाचे डाक अधीक्षक डॉ. बी. एच. नागरगोजे यांनी केले आहे.