Osmanabad : भिमकोरेगाव दंगलीनंतर महाराष्ट्रभर हजारो भीमसैनिकांवर दाखल केलेले गुन्हे स्वतंत्र जीआर काढून तात्काळ रद्द करणे. तामसा जि.नांदेड येथील भीमसैनिकांची निर्दोष मुक्तता करणे व अनुसूचित जाती जमातींशी निगडित आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक व इतर मागण्यांबाबत.
१ जानेवारी २०१८ रोजी भिमाकोरेगाव येथे धार्मिक उन्मादी व मनुवाद्यांकडून सुनियोजितपणे दंगल घडविली गेली ज्यात शोर्यस्तंभाला अभिवादन करण्यासाठी आलेल्या भीमअनुयायांना मारहाण करण्यात आली, परिसरात जाळपोळ करण्यात आली, गाड्या फोडण्यात आल्या. यानंतर महाराष्ट्राभर या दंगलींच्या निषेधार्थ, दंगली घडवणाऱ्यांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी भीमसैनिकांमार्फत आंदोलने करण्यात आली. परंतु तत्कालीन सरकारने दंगल घडवणाऱ्यावर कारवाई करण्याच्या ऐवजी रस्त्यावर उतरून आंदोलन करणाऱ्या भीमसैनिकांवर सर्रासपणे गुन्हे नोंदविले होते. या भीमसैनिकांमध्ये विद्यार्थी, महिला, वृद्ध यांचा समावेश होता, या सर्वांवर गुन्हे नोंदवत सरकारने यांचे आयुष्य उध्वस्त करण्याचा प्रयत्न केला. आज या घटनेला ३ वर्ष उलटून गेले तरीही सरकारकडून भीमसैनिकांवरील गुन्हे मागे घेण्यात आलेले नाहीत.
यानंतरच्या काळात महाराष्ट्र सरकारने मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी रस्त्यावर उतरलेल्या आंदोलकांवरील गुन्हे, आरे कारशेड बचावसाठी आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवरील गुन्हे, कोरोना काळात दाखल झालेले गुन्हे स्वतंत्र पद्धतीचे जीआर काढत रद्द केलेले आहेत. यापेक्षाही महत्त्वाचे म्हणजे आधीचे मुख्यमंत्री व सध्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर असलेले 125 राजकीय गुन्हे त्यांनी स्वतःसाठी जीआर काढून मागे घेतले परंतु भीमसैनिकांवरील गुन्हे रद्द करण्यासंदर्भात कोणताच स्वतंत्र जीआर काढण्यात आलेला नाही, या प्रकारामूळे सरकारची पक्षपाती भूमिका समोर आलेली आहे.
त्यामुळे या गंभीर विषयांसंदर्भात व अनुसूचित जाती जमातीच्या आर्थिक, सामाजिक व इतर प्रश्नांबाबत ऑल इंडिया पॅंथर सेनेच्या वतीने उस्मानाबाद जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले व जर का भिमा कोरेगाव दंगलीतील भिमसैनिकांवरील गुन्हे मागे नाही घेतल्या ऑल इंडिया पॅथर सेनेच्या वतीने मंत्रालयावर धडक मोर्चा घेवुन आल्याशिवाय राहणार नाही असे जिल्हाधिकारी साहेबांन मार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन द्वारे कळविण्यात आले आहे.
उपस्थित: जिल्हाध्यक्ष उस्मानाबाद धनंजय हुंबे, युवक जिल्हाध्यक्ष यशपाल गायकवाड, ग्रामीण जिल्हाध्यक्ष अशोक कसबे, भागवत शेंडगे, पृथ्वीराज वाघमारे, नवनाथ जोगदंड, किरण कांबळे, प्रतिक सुर्यवंशी इत्यादी पदअधिकारी आणी कार्यकर्ते उपस्थितीत होते.