येडशी येथे राष्ट्रवादीचा उद्या राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन
थकीत ऊसबीलासाठी कारखान्याचा साखर विक्री परवाना रद्द करण्याची मागणी
उस्मानाबाद : जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकर्यांचे पहिले बील त्वरीत मिळावे, यासाठी शासनाने साखर कारखान्यांचे साखर विक्री परवाने रद्द करण्यात यावेत, या मागणीसाठी राष्ट्रवादीच्या वतीने बुधवारी (दि.3) येडशी येथे राष्ट्रीय महामार्गावर राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष संजय पाटील दुधगावकर यांच्या नेतृत्वाखाली शेतकर्यांसह रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे. असा इशारा सोमवारी (दि.1) जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात दिला आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकर्यांनी अतिरिक्त झालेला ऊस जिल्ह्याबाहेरील व जिल्ह्यातील साखर कारखान्याकडे सन 2021-2022 जानेवारी ते मे महिन्यापर्यंत पाठविला होता. ऊस पाठवून चार महिने होत आले. परंतू ऊस घेवून जाणार्या साखर कारखान्यांनी अद्यापपावेपर्यंत ऊस बिलाची पहिली उचल दिली नाही. व काही कारखान्यानी एफआरपी प्रमाणे पहिली उचल दिलेली नाही, त्यामुळे त्यांचा आम्ही धिक्कार करतो. तसेच जिल्ह्यामध्ये मागील आठ दिवसांमध्ये पावसाने शेतकर्यांचे प्रचंड नुकसान केले आहे. त्यातच शेतकर्यांचे नगदी पीक असणार्या सोयाबीन पीकाचे मोठ्या प्रमाणात गोगलगाईनी खाऊन फस्त केले आहे. शेतकर्यांसमोर मोठ्या प्रमाणात आर्थिक अडचणी असल्यामुळे जिल्ह्यातील पाच शेतकर्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत. असे असताना शेतकर्यांना त्वरीत पहिली उचल मिळण्यासाठी आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने आंदोलन करुन शेतकर्यांना त्वरीत पैसे मिळणेबाबत पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. परंतू अद्याप कारखान्यांनी ऊसाचे बील शेतकर्यांना दिले नाही. त्यासाठी साखर आयुक्त, जिल्हाधिकारी यांनी संयुक्तपणे शेतकर्यांचे बील न देणार्या साखर कारखान्याविरोधात संबधित साखर कारखान्याचे साखर विक्री परवाने रद्द करुन शासकीय अधिकारी नेमून साखर विक्री करावी व शेतकर्याचे पहिले बील त्वरीत अदा करावे, यासाठी बुधवारी (दि.8) येडशी येथील राष्ट्रीय महामार्गावर रास्तारोको आंदोलन करण्यात येईल, असा इशारा निवेदनात संजय पाटील दुधगावकर यांनी दिला आहे.