उस्मानाबाद,दि.27(जिमाका):- अनु.जाती, वि.जा.भ.ज, इमाव आणि विमाप्र प्रवर्गातील व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेवू इच्छिणारे विदयार्थी जात प्रमाणपत्र पडताळणी करीता समितीकडे विहित कालमर्यादेत अर्ज सादर करत नाहीत. त्यामुळे असे विदयार्थी शैक्षणिक तसेच इतर लाभापासून वंचित राहतात. या प्रवर्गातील बारावी विज्ञान आणि व्यावसायिक अभ्यासक्रमातील विदयार्थ्याचे जात प्रमाणपत्र पडताळणीचे प्रस्ताव विहित वेळेत प्राप्त करून घेण्यासाठी तसेच जिल्हयातील विदयार्थ्यामध्ये जाणीव जागृती व्हावी, जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी अर्ज कसा भरावा, कोणती कागदपत्रे जोडावीत यासह संपूर्ण प्रक्रियेबाबत सविस्तर माहिती देण्याकरीता जिल्हयामध्ये शिबीरे आयोजित केली जात आहेत.
त्या अनुषंगाने नुकतेच उमरगा तालुक्यातील श्री.छत्रपती शिवाजी कॉलेज येथील विद्यार्थ्यामध्ये जात प्रमाणपत्र पडताळणीबाबतची जनजागृती करण्यासाठी विदयार्थ्याना जात वैधता प्रमाणपत्राचे वाटप करण्याच्या शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेस संशोधन अधिकारी तथा सदस्य सचिव एस.टी.नाईकवाडी, कॉलेजचे प्राचार्य डॉ.जाधव, उपप्राचार्य मोरे सर, पर्यवेक्षक महामुनी सर तसेच उमरगा तालुक्यातील सर्व महाविद्यालयाचे प्राध्यापक आणि महाविद्यालयातील 280 विद्यार्थी तसेच समितीचे कर्मचारीही उपस्थित होते.
*****


