उस्मानाबाद,दि,17(जिमाका): दि.19 फेब्रुवारी 2023 रोजी शिवजयंती निमित्त रक्तदान मोहिम राबविण्याचे शासनाचे धोरण असुन या पुर्ण वर्षभरात सामान्य जनतेमध्ये रक्तदानाचे महत्व पटवून देण्यासाठी व जागरूकता निर्माण करण्यासाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्याचे धोरण असल्याने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उस्मानाबाद यांच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभाग मुंबई यांच्या अंतर्गत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालय यांच्या वतीने शिवजयंती निमित्त रक्तदान मोहिम व जनजागृती मोहिम आयोजित करण्यात आली आहे. त्या अंतर्गत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.दि. 19 फेब्रुवारी रोजी रक्तदानाविषयी जनजागृती करण्यासाठी सकाळी ८:३० वाजता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथुन प्रभात फेरी सुरू होऊन छत्रपती शिवाजी महाराज चौक पर्यंत आणि सकाळी ९:३० वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे पदवीपूर्व विद्यार्थ्यांच्या पथनाट्याचे सादरीकरण करण्यात येणार तसेच या मोहिमे अंतर्गत संपूर्ण वर्षभरात विविध ठिकाणी रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात येणार आहे.
रक्तदान हे जीवनदान आहे. मानवी रक्ताला अद्याप तरी पर्याय उपलब्ध नाही. रक्तदानामुळे रक्तदात्यास कोणताही अपाय होत नाही. आपातकालिन रुग्णांसाठी तसेच अतिरक्तस्त्रावामुळे होणाऱ्या गर्भवती मातांचा मृत्यु रोखण्यासाठी तसेच उन्हाळ्यामध्ये रक्तपेढीमध्ये रक्ताचा तुटवडा भासु नये म्हणुन सर्वांनी रक्तदानांसाठी पुढे येऊन उत्सर्फुतपणे प्रतिसाद द्यावा असे आवाहन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रभारी अधिष्ठाता प्रा. डॉ. उज्वला गवळी यांनी केले आहे.