google.com, pub-1406548548385211, DIRECT, f08c47fec0942fa0 आदर्श आश्रम शाळेत जिल्हास्तरीय आश्रम शाळा क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन

आदर्श आश्रम शाळेत जिल्हास्तरीय आश्रम शाळा क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन

0
धाराशिव (प्रतिनिधी):
सुदृढ आरोग्यासाठी मैदानी खेळ अत्यंत महत्त्वाचे असून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी क्रीडा स्पर्धांचे योगदान मोलाचे आहे, असे प्रतिपादन इतर मागास बहुजन कल्याण विभाग, धाराशिव येथील सहाय्यक संचालक अमोल ताकभाते यांनी केले.
शिंगोली (ता. जि. धाराशिव) येथील आदर्श आश्रम शाळेच्या प्रांगणात १९ ते २१ जानेवारी या कालावधीत आयोजित जिल्हास्तरीय आश्रम शाळा क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन त्यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले. उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी इतर मागास बहुजन कल्याण विभाग, लातूर येथील प्रादेशिक उपसंचालक तेजस माळवदकर, इतर मागास बहुजन कल्याण विभाग धाराशिवचे निरीक्षक युवराज भोसले, शिक्षण विस्तार अधिकारी (येडशी बीट) प्रकाश पारवे, तसेच बिरमल तरंगे, अण्णासाहेब चव्हाण, विठ्ठल म्हेत्रे, वैभव जाधव, संतोष चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.
सहाय्यक संचालक अमोल ताकभाते पुढे म्हणाले की, व्यक्ती वयाच्या उत्तरार्धात खेळाचे महत्त्व लक्षात येते, मात्र तोपर्यंत वेळ निघून गेलेली असते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी लहान वयापासून खेळाची आवड जोपासावी. क्रीडा स्पर्धांच्या माध्यमातून विद्यार्थी आरोग्याची गुरुकिल्ली आत्मसात करत असल्याने हे निश्चितच स्वागतार्ह आहे.
मात्र काही ठिकाणी स्पर्धांमध्ये चुकीच्या पद्धतीने विद्यार्थ्यांना खेळवले जात असल्याने स्पर्धेची बदनामी होत असल्याचे निदर्शनास आले आहे. अशा प्रकारच्या गैरप्रकारांमध्ये दोषी आढळणाऱ्या शाळांवर दहा हजार रुपयांचा दंड आकारण्यात येणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला.
तीन दिवस चालणाऱ्या या क्रीडा स्पर्धेत प्राथमिक १९, माध्यमिक १२ आणि उच्च माध्यमिक ७ अशा एकूण ३८ शाळांनी सहभाग नोंदवला आहे. उद्घाटनानंतर प्राथमिक व माध्यमिक गटातील स्पर्धांना सुरुवात करण्यात आली असून आदर्श आश्रम शाळेचा परिसर विद्यार्थ्यांच्या उत्साहाने गजबजून गेला आहे.
उद्घाटन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यानिकेतन माध्यमिक आश्रम शाळेचे पर्यवेक्षक रत्नाकर पाटील यांनी केले. आदर्श आश्रम शाळेचे मुख्याध्यापक सतीश कुंभार यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी स्पर्धा यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेत आहेत.
कार्यक्रमासाठी शिक्षण विस्तार अधिकारी प्रकाशजी पारवे, केंद्रप्रमुख सुकेशनी वाघमारे, तसेच क्रीडा शिक्षक सुधीर कांबळे, चंद्रकांत जाधव, खंडू पडवळ, दीपक खबोले, प्रशांत राठोड, कैलास शानिमे, मल्लिनाथ कोणदे, विशाल राठोड, सचिन राठोड, सुरेखा कांबळे, श्रद्धा सूर्यवंशी, ज्योती राठोड, ज्योती साने, बालिका बोयणे आदींसह वरिष्ठ लिपिक संजीवकुमार मस्के, गोविंद बनसोडे, सचिन अनंतकळवास, रेवा चव्हाण, अमोल जगताप, अविनाश घोडके, लिंगा आडे यांनी स्पर्धा यशस्वी पार पाडण्यासाठी मोलाचे सहकार्य केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top