उस्मानाबाद दि.१२ (प्रतिनिधी) - शिक्षकांच्या विविध प्रलंबित मागण्या असून त्या सोडविण्यात याव्यात या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्यावतीने मुख्य कार्यकारी अधिकारी कार्यालयासमोर दि.१२ जून आंदोलन करण्यात आले.
जिल्ह्यातील प्राथमिक पदवीधर शिक्षकांना त्यांच्या विनंतीनुसार पदावनत करण्यात यावे, पदवीधर शिक्षक या पदावर दर्जावाढ द्यावी. प्राथमिक पदवीधर शिक्षकातून केंद्र प्रमुखांची रिक्त पदे भरण्यात यावीत. वैद्यकीय प्रतिपूर्ती देयक प्रस्ताव निकाली काढावेत. भविष्य निर्वाह निधी परतावा व नापरतावा अग्रीम प्रस्ताव मान्य करण्याचे अधिकार गट शिक्षणाधिकाऱ्यांना देण्यात यावेत. २०२०-२१ संच मान्यतेनुसार अतिरिक्त शिक्षकांचे केलेले समायोजन कायम करण्यात यावे. वरिष्ठ वेतनश्रेणी व निवडश्रेणी पात्र शिक्षकांना वेतनश्रेणी देण्यात यावी. पदोन्नती प्राप्त सेवानिवृत्त मुख्याध्यापकांना रजा रोखीकरण्याचा लाभ देण्यात यावा. चालू वर्षाच्या जिल्हा शिक्षक पुरस्कारासोबत मागील तीन वर्षाचे प्रलंबित असलेले जिल्हा शिक्षक पुरस्कार देण्यात यावेत. दीर्घ वास्तव्य असलेल्या विषय तज्ञ व साधन व्यक्ती यांच्या बदल्या करण्यात याव्यात. कोरोना काळात संकलित झालेल्या निधीचा योग्य विनियोग करण्यात यावा व बिंदू नामावली (रोस्टर) अद्यावत करण्यात यावी या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आले. यावेळी राष्ट्रीय उपाध्यक्ष बाळकृष्ण तांबारे, जिल्हाध्यक्ष संतोष देशपांडे, लक्ष्मण पडवळ, सरचिटणीस विठ्ठल माने, प्रसिद्धीप्रमुख प्रदीप म्हेत्रे, राहुल भंडारे, दत्ता पवार, रामेश्वर शिंदे, शिवाजी शिंदे, डी.डी. कदम, बालाजी मसलगे, सुदर्शन जावळे, संतोष मोळवणे, सुधीर वाघमारे, श्रीनिवास गलांडे, उमेश भोसले, सोमनाथ टकले, भक्तराज दिवाणे, अर्जुन गुंजाळ, शेषेराव राठोड, हनुमंत पडवळ, शिवाजी दराडे, मोहनराव जगदाळे, बालाजी माळी, सचिन राऊत, एम.वाय. चाटे, एम.ए. पुरी, आर.एन. हलसीकर, यु.आर. भोसले आदींसह शिक्षक व शिक्षिका मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी झाल्या होत्या.