शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्यासाठी १०० % सौर ऊर्जीकरण मिशन मोडमध्ये अंमलबजावणी करण्याच्या जिल्हाधिकारी यांना सूचना - आ.राणाजगजितसिंह पाटील
Osmanabad news :
शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध करून देण्यासाठी कृषी फिडरचे सौर ऊर्जीकरण मिशन मोडमध्ये करण्याच्या अनुषंगाने मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 ची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी करून 100% कृषी फिडरचे सौर ऊर्जीकरण करण्याच्या सूचना आ.राणाजगजितसिंह पाटील यांनी जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी व अधिक्षक अभियंता महावितरण यांना दिल्या आहेत. तसेच मुख्य अभियंता महावितरण यांना देखील नियमित आढावा घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. उपमुख्यमंत्री ना. देवेंद्रजी फडणवीस साहेब धाराशिवच्या दौऱ्यावर आल्यानंतर याबाबत चर्चा झाली होती व आढावा देखील घेण्यात आला होता.
राज्यामध्ये ऊर्जेच्या एकूण वापरापैकी कृषीक्षेत्रासाठी सुमारे 22% वापर प्रामुख्याने कृषी पंपासाठी वीजपुरवठा करण्यासाठी होतो. या योजनेंतर्गत सन 2025 पर्यंत एकूण कृषी वापरापैकी किमान 30% कृषी वीज वाहिनीचे सौर ऊर्जीकरण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आलेले आहे. मात्र, जिल्ह्यातील सर्व कृषी फिडरचे सौर ऊर्जीकरण करण्यासाठी आवश्यक जमीन उपलब्ध करून देण्याचे जिल्हाधिकारी यांना सूचित केले आहे. कृषी फिडरच्या सौर ऊर्जीकरणामुळे शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध करून देणे शक्य होणार असून यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. तसेच जमीन भाडेतत्त्वावर दिल्यास यातून देखील मोठा आर्थिक फायदा होणार आहे.
या योजनेंतर्गत वीज उपकेंद्रापासून 10 कि.मी. परिघातील शासकीय जमीन अथवा 5 कि.मी. परिघातील खाजगी जमीन भाडे तत्त्वावर घेण्यात येणार आहे. शेतकऱ्यांना प्रती हेक्टरी रु.1,25,000/- वार्षीक भाडेपट्टा म्हणून देण्यात येणार असून वार्षीक भाडेपट्टा दरावर प्रतीवर्षी 3% प्रमाणे वाढ करण्यात येणार आहे. यासाठी जमीन अकृषी करण्याची देखील गरज राहणार नसून अशा जमीनीवर महसुल अथवा स्थानिक स्वराज्य संस्थांकडून कोणताही कर आकारण्यात येणार नाही.
जिल्ह्यात ९४ वीज उपकेंद्र असून ३२३ कृषी फिडर आहेत. या फिडरचे सौर ऊर्जीकरण करण्यासाठी ३४८५ एकर जमीनीची आवश्यकता आहे. निर्धारित निकाषा प्रमाणे एवढी शासकीय जमीन उपलब्ध नाही. त्यामुळे इच्छुक शेतकऱ्यांची यादी तयार करण्याच्या सूचना महसुल विभागाला देण्यात आलेल्या आहेत. तसेच या योजनेपेक्षा जास्त उत्पन्न देवू न शकणाऱ्या जमीनी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी यासाठी उपलब्ध करून द्याव्यात, असे आवाहन आ.राणाजगजितसिंह पाटील यांनी केले आहे.