प्रतिकूल परिस्थितीत ही भैरवनाथ अध्यापक विद्यालयाने आपला नावलौकिक टिकवला-डॉ.गजेंद्र जमादार
कळंब - ( osmanabad news )राज्यातील अध्यापक विद्यालयांची परिस्थिती अवघड व नाजूक असताना कळंब येथील भैरवनाथ अध्यापक विद्यालयाने केलेल्या सुधारणा,विद्यार्थी संख्या व सर्व अभिलेखे पाहिल्यानंतर या अध्यापक विद्यालयातून शिक्षण घेतलेले विद्यार्थी भाविष्यात वेगवेगळ्या क्षेत्रात चमकतील असे प्रतिपादन जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे अधिव्याख्याता तथा भैरवनाथ अध्यापक विद्यालयाचे संपर्क अधिकारी डॉ.गजेंद्र जमादार यांनी केले.
एस.सी.ई.आर.टी.च्या वतीने राज्यातील अध्यापक विद्यालय तपासणी मोहीम सध्या सुरू असून त्या अनुषंगाने धनेश्वरी शिक्षण समुहाचे अध्यक्ष डॉ.प्रतापसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखालील भैरवनाथ अध्यापक विद्यालयाच्या तपासणीसाठी आले होते. यावेळी विद्यार्थ्यांशी ते संवाद साधत असताना बोलत होते. यावेळी व्यासपीठावर जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे अधिव्याख्याता डॉ.उमेश नरवडे,अधिव्याख्याता मिलिंद अघोर, भैरवनाथ अध्यापक विद्यालयाचे प्राचार्य सतिश मातने यांची उपस्थिती होती.
पुढे बोलताना डॉ.गजेंद्र जमादार म्हणाले की,भैरवनाथ अध्यापक विद्यालयातील सर्व कर्मचारी वर्ग प्रतिकूल परिस्थितीवर मात करत त्यांना सर्व सुखसोयी व ज्ञान देण्याचा प्रयत्न करत असून अशा भौतिक सुविधा असणारे अध्यापक विद्यालय जिल्ह्यात मी तरी पाहिले नाही असे गौरव उद्गगार काढले. विद्यार्थ्यांनी या गोष्टीचा फायदा घेऊन भविष्यात आपल्या कॉलेजचा यशाचा टक्का नोकर भरतीमध्ये जास्त राहावा याकरिता प्रयत्नशील रहावे.जर विद्यार्थ्यांनी प्रात्यक्षिक कार्य चांगले केले तर ते ज्ञान चिरंतर विद्यार्थ्यांच्या लक्षात राहते त्यामुळे प्रात्यक्षिक कार्यावर देखील भर दिला पाहिजे असेही त्यांनी यावेळी बोलताना सांगितले.
यावेळी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे अधिव्याख्याता डॉ.उमेश नरवडे,मिलिंद अघोर, यांनी आपल्या मनोगतात अध्यापक विद्यालयाच्या शिस्त व सुधारणेबद्दल कौतुक करत विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य सतिश मातने यांनी सूत्रसंचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा.अविनाश घोडके तर आभार प्रा.श्रीकांत पवार यांनी मानले.
यावेळी प्रा.संग्राम मोहिते,प्रा.सागर पालके,प्रा.मोहिनी शिंदे,ग्रंथपाल प्रगती धाराव,आय.टी.आय.प्राचार्य सूरज भांडे,निदेशक अविनाश म्हेत्रे,लिपिक आदित्य गायकवाड,विनोद कसबे
व सर्व प्रशिक्षणार्थी अध्यापकांची उपस्थिती होती.