टेक्निकल टेक्सटाईल पार्क १२५० एकरवर, मुलभूत सुविधा निर्मितीचे उद्योग मंत्री ना. उदय सामंत यांचे आदेश - आ. राणाजगजितसिंह पाटील , Technical Textile Park

0

टेक्निकल टेक्सटाईल पार्क १२५० एकरवर, मुलभूत सुविधा निर्मितीचे उद्योग मंत्री ना. उदय सामंत यांचे आदेश - आ. राणाजगजितसिंह पाटील , Technical Textile Park


Osmanabadnews : कौडगाव औद्योगिक क्षेत्रामध्ये टेक्निकल टेक्सटाईल पार्क उभारण्याच्या अनुषंगाने मूलभूत सुविधा निर्मितीची प्रक्रिया सुरू करण्यासह प्रकल्पाचा ‘मास्टर प्लॅन’ (विस्तृत परिपुर्ण आराखडा) तयार करण्याच्या सूचना उद्योगमंत्री ना.  उदय सामंत यांनी एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

जिल्ह्यातील युवकांना रोजगाराच्या संधी निर्माण करून देण्यासाठी मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मितीची क्षमता असलेला टेक्निकल टेक्सटाईल पार्क कौडगाव एमआयडीसी मध्ये उभारण्याची मागणी आ. राणाजगजितसिंह पाटील यांच्याकडून सातत्याने केली जात होती. या मागणीच्या अनुषंगाने अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये उद्योग मंत्री ना. उदय सामंत यांनी उस्मानाबादला एमआयडीसीच्या माध्यमातुन टेक्नीकल टेक्सटाईल पार्क उभारण्याची अधिकृत घोषणा केली. या बाबतचा आढावा घेण्यासाठी आ. राणाजगजितसिंह पाटील यांच्या विनंतीवरुन दिनांक ०५ जुलै २०२३ रोजी उद्योग मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. महा जनसंपर्क अभियानांतर्गत धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्या दरम्यान जाहीर सभेमध्ये देखील उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांनी उस्मानाबादला टेक्निकल टेक्सटाईलचे ॲंकर युनिट (Anchor Unit) आणण्याचा शब्द दिला होता.
 
सदरील बैठकीत गुजरात मधील वापी येथे उभारलेल्या पार्कच्या धर्तीवर सुमारे १२५० एकर जागेवर पार्क विकसित करण्याचा निर्णय घेण्यात आला असून पहिल्या टप्प्यात ५०० एकर क्षेत्र विकसित करण्यात येणार आहे. या ठिकाणी आवश्यक त्या मूलभूत सुविधा जसे की, सार्वजनिक सुविधा, पाणी, अंतर्गत रस्ते व पार्किंग आदी सुविधा निर्माण करण्याची प्रक्रिया सुरु करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. बैठकीमध्ये बार्शी तालुक्यातील प्रलंबीत १००० हेक्टर जमीनीच्या भूसंपादन प्रक्रियेला गती देण्याच्या सूचना एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.

इतर वस्त्रनिर्मिती उद्योगापेक्षा तांत्रिक वस्त्र (टेक्निकल टेक्सटाईल) उत्पादनाला जगभर अधिकचा वाव आहे. उस्मानाबाद सारख्या आकांक्षित जिल्ह्यात या प्रकारचा उद्योग उभारल्यास १० हजार रोजगार निर्मीतीसह जिल्ह्याच्या अर्थकारणाचा कायापालट करण्याची क्षमता या प्रकल्पामध्ये आहे.

यावेळी प्रधान सचिव (उद्योग) मंत्रालय, मुंबई, मुख्य कार्यकारी अधिकारी, म.औ.वि.म.मुंबई,  सह मुख्य कार्यकारी अधिकारी, मऔविम,  सह सचिव उद्योग विभाग, उप मुख्य कार्यकारी अधिकारी, मऔविम, मुख्य अभियंता (मुख्यालय) मऔविम, महाव्यवस्थापक (भूमी) मऔविम, प्रादेशिक अधिकारी, मऔविम, लातूर आणि इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते.  
Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top