अवैध धंदेवाल्यांकडून हप्ते घेणाऱ्या पोनि गायकवाड यांच्यावर कारवाई करण्याची मागणी ,
ॲट्रॉसिटीचा खोटा गुन्हा दाखल केल्याचा आरोप
सरपंच महिलेचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण
उस्मानाबाद दि.७ ( osmanabadnews ) - गाव व परिसरातील अवैध धंदे करणाऱ्या विरुद्ध तक्रार दिल्याचा राग मनात धरून ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सरपंच पती तथा ग्रामपंचायत सदस्य यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करण्याची धमकी देत आहेत. तसेच अवैध धंदे करणारे किशोर लगदिवे व ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गायकवाड यांच्या मोबाईलवरील संभाषणाची चौकशी करावी. या मागणीसाठी शेकापूरच्या सरपंच पुष्पा किरण लगदिवे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे.
दिलेल्या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की, पुष्पा लगदिवे या शेकापूर ग्रामपंचायत च्या २०२२ पासून सरपंच तर त्यांचे पती सदस्य म्हणून कार्यरत आहेत. तर २०१७ ते २०२२ दरम्यान पती किरण लगदिवे हे सरपंच व पुष्पा या सदस्य होत्या. तसेच गावातीलच किशोर हनुमंत लगदिवे हे पराभूत झाल्यापासून तेव्हापासून ते गावात मटका चालवतात व त्यांची ग्रामीण पोलीस स्टेशन च्या अधिकाऱ्यांशी संपर्क असून सर्व अवैद्य धंदे गावात चालवले जात आहेत. याबाबत किरण व पुष्पा लगदिवे यांनी ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गायकवाड यांच्याकडे हे अवैध धंदे बंद करण्यासाठी वारंवार संपर्क साधला असता ते विनाकारण धमकी देत आहेत. तसेच गावातील वादग्रस्त जागे बाबत नागनाथ केरबा कांबळे व कुबेर भीमराव लगदिवे यांच्या जागेसाठी दि.२३ जून २०२३ रोजी सुरज लगदिवे यांनी नागनाथ कांबळे यांच्या विरोधात तक्रार झाली होती. त्यामुळे किरण यांनी बीट अंमलदार यांच्याशी संपर्क साधून गावातील दोन समाजातील भांडण असल्यामुळे हे प्रकरण तुम्ही स्वतः लक्ष घालून हाताळावे अशी विनंती केली. मात्र पोलीस निरीक्षक गायकवाड व बीट अंमलदार यांनी कोणतीही कारवाई केली नाही. दि. १२ जुलै २०२३ रोजी त्या जागेसाठी नागनाथ कांबळे व कुबेर लगदिवे यांचे तक्रार झाल्याने रात्री १२.४१ वाजता पुष्पा व किरण लगदिवे, धीरज लगदिवे, प्रमिला कुबेर लगदिवे यांच्यावर ॲट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल झाला त्यावेळेस किरण व पुष्पा हे दोघे त्यांचे माहेर अपसिंगा येथे सकाळी ११ ते दुपारी २ वाजेपर्यंत होते. तसेच किरण लगदिवे यांना दारूची सवय असल्यामुळे ते व त्यांच्या भाऊ तुळजापूर येथील किंग्ज बार येथे दुपारी २ ते सायंकाळी ४.३० वाजेपर्यंत थांबले होते.
किरण यांनी कांबळे व लगदिवे यांची तक्रार मिटविण्यावरुन सायं. ६.३० वाजता पोनि गायकवाड व किरण लगदिवे यांच्यात बाचाबाची झाली. तसेच दि.१ ऑगस्ट रोजी पोलीस गायकवाड हे शेकापूर येथे आले त्यांनी या जागे बाबत कसलीही चौकशी न करता किरण व पोलीस पाटील यांना अरेरव्याची भाषा वापरून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती समितीचे अध्यक्ष व उपाध्यक्ष यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली. त्यामुळे पराभूत झालेल्या किशोर लगदिवे यांनी किरण यांच्या विरोधात या पुढील काळात राजकीय हेतूने कोणत्याही अडचणीमध्ये पुष्पा व किरण यांच्यावर खोटा गुन्हा दाखल केल्यास त्यास पोनि गायकवाड हे जबाबदार राहतील. तसेच दिनांक पाच ऑगस्टपर्यंत पोनि गायकवाड व किशोर लगदिवे यांच्या मोबाईल संभाषणाची चौकशी करून त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे.