धनगर आरक्षणासंदर्भात सकारात्मक बैठक - शिंदे-फडणवीस सरकारची माहिती

0

धनगर आरक्षणासंदर्भात सकारात्मक बैठक - शिंदे-फडणवीस सरकारची माहिती 

मुंबई : धनगर आरक्षणासंदर्भात आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे सकारात्मक बैठक झाली.

मंत्री सर्वश्री राधाकृष्ण विखे पाटील, गिरीश महाजन, अतुल सावे, तसेच आ. गोपीचंद पडळकर, राम शिंदे, दत्तात्रय भरणे व इतर धनगर समाजातील नेते उपस्थित होते.
धनगर समाजाच्या प्रश्नावर सरकार संवेदनशील आहे. हा प्रश्न लवकर सुटला पाहिजे, याच मताचे आम्ही आहोत. पण संवैधानिक प्रक्रिया पूर्ण करावीच लागेल. तोवर धनगर समाजाच्या कल्याणासाठी मोठा निधी देण्यात आला आहे. आणखी ₹10,000 कोटी आपण जाहीर केले आहेत.

 एसटीच्या सर्व सवलती धनगर समाजाला लागू केल्या आहेत. उच्च न्यायालयात जो खटला सुरू आहे, त्यात महाराष्ट्रात धनगड नाही तर धनगर आहे, असे सुस्पष्ट प्रतिज्ञापत्र आमच्याच सरकारच्या काळात आम्ही दिले. आता हा खटला अंतिम टप्प्यात आहे. शिवाय संवैधानिक प्रक्रिया पूर्ण करण्याची कार्यवाही आम्ही करतो आहोत, अशी भूमिका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडली.

यावेळी चर्चेत जे मुद्दे उपस्थितांनी मांडले, त्यानुषंगाने अन्य राज्यांनी केलेली प्रक्रिया तपासून त्याबाबत देशाच्या अटर्नी जनरल यांचे कायदेशीर मत घेण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. यासाठी अधिकारी आणि धनगर समाज प्रतिनिधी हे त्या राज्यांमध्ये जाणार आहेत. धनगर समाजाच्या कल्याणासाठी विविध योजनांच्या अंमलबजावणीसाठी योग्य निर्देश यावेळी देण्यात आले. राज्य सरकार आरक्षणासह सर्व मागण्यांवर सकारात्मक आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.

#OBC #OBCReservation #Maharashtra #Mumbai #धनगर #dhangar #धनगरआरक्षण

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top