कांदा उत्पादक शेतकऱ्यांची दिवाळी होणार गोड! , भाजपा जिल्हाध्यक्ष संताजी चालुक्य पाटील यांच्या प्रयत्नांना यश

0
कांदा उत्पादक शेतकऱ्यांची दिवाळी होणार गोड! , भाजपा जिल्हाध्यक्ष संताजी चालुक्य पाटील यांच्या प्रयत्नांना यश

उस्मानाबाद - धाराशिव-
जिल्ह्यातील अनुदानपात्र  कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा अनेक महिन्यापासून रखडलेला अनुदानाचा प्रश्न दिवाळीपूर्वी मार्गी लागेल. वित्त विभागाकडून निधी उपलब्ध झाला असल्याची माहिती भाजपाचे जिल्हाध्यक्ष संताजी चालुक्य पाटील यांनी परंडा येथे शेतकरी बांधवांशी बोलताना  दिली.


राज्यातील अनेक जिल्ह्यात कांदा अनुदानाचे वितरण झाले आहे. मात्र परंडा तालुक्याचे कांदा अनुदान वितरण अनेक महिन्यापासून रखडले होते. अनुदानाबाबत उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांचेकडे पाठपुरावा केला. तर दि. 9 आक्टोबर रोजी पणन मंत्री अब्दुल सत्तार याचेकडे तालुक्यातील अनुदानपात्र शेतकऱ्यांना कांदा अनुदान देण्याची मागणी निवेदनाद्वारे केली होती.  तसेच याबाबत संबधीताशी भेटून देखील तात्काळ अनुदान वितरीत करण्याची मागणी केली. मंगळवारी (दि.31 ) जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था ) सुनील शिरापूरकर यांचेकडे अनुदानाबाबतच्या स्थितीची दुरध्वनीद्वारे चर्चा केली असता पणन विभागाच्या मागणीप्रमाणे वित्त विभागाने निधी उपलब्ध करून दिला आहे. याद्या तयार झाल्या आहेत. लवकरच अनुदान वितरणाची कारवाई केली जाईल. असे जिल्हा निबंधक शिरापूरकर यांनी सांगितल्याचे जिल्हाध्यक्ष चालुक्य पाटील यांनी सांगितले.    


कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या कांद्याला भाव नसल्याने मातीमोल किमतीत कांद्यांची विक्री करावी लागली होती. उत्पादन खर्चही न निघालेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिक्विंटल 350 रुपये अनुदान देण्याचे  शासनाचे ठरविले होते. दिवाळीपूर्वी परंडा तालुक्यातील अंदाजे पाच हजार शेतकऱ्यांचा अनुदानाचा प्रश्न मार्गी लागणार असल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांची दिवाळी गोड होण्याची चिन्हे दिसत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top