धाराशिव - भाजपा युवा मोर्चाचे माजी जिल्हा उपाध्यक्ष प्रविण (बप्पा) घुले हे तेरखेडा जिल्हा परिषद गटातून निवडणूक लढविण्यास इच्छुक आहेत.
अद्याप जिल्हा परिषद निवडणूका जाहीर झाल्या नसल्या तरी इच्छुकांकडून हालचाली सुरू झाल्या असून मोर्चेबांधणी देखील सुरू करण्यात आली आहे. तेरखेडा जिल्हा परिषद गटातून भाजप युवा मोर्चाचे माजी जिल्हा उपाध्यक्ष प्रवीण बप्पा घुले हे इच्छुक आहेत. प्रविण घुले हे तेरखेडा जिल्हा परिषद गटात मागील ५ वर्षांपासून सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक, शैक्षणिक तसेच आरोग्य अशा विविध क्षेत्रात करत असलेल्या उल्लेखनीय कामाच्या माध्यमातून घराघरात पोहोचले आहेत.
तेरखेडा परीसरात मोठ्या संख्येने भूमीहीन किंवा अल्पभूधारक कुटुंब आहेत ज्यांना कायम असा उत्पन्न स्त्रोत नाही. अशा जवळपास २००० व्यक्तींना केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी असंघटित कामगार आणि कॉर्पोरेट (CSR फंड) माध्यमातून सततचे मानधन मिळवून देण्याचा प्रविण बप्पा घुले यांचा संकल्प आहे.
सार्वजनिक सुरक्षा या अतिशय महत्त्वाच्या विषयात प्रविण (बप्पा) घुले हे मागील ५ वर्षांपासून तेरखेडा आणि परीसरात चालू असलेले विविध अवैध धंदे (अवैध दारूविक्री, मटका, सावकारी, गुंडगिरी) बंद व्हावेत यासाठीही प्रयत्नशील आहेत.
एकीकडे पवनचक्की प्रकल्प कंपन्या तेरखेडा जिल्हा परिषद गटातील सर्वपक्षीय नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना विविध कंत्राटाच्या माध्यमातून आर्थिक देवाणघेवाणीद्वारे हाताशी धरून शेतकऱ्यांची पिळवणूक करीत असताना, जनसेवक म्हणून ओळखले जाणारे प्रविण (बप्पा) घुले हे सातत्याने शेतकऱ्यांच्या बाजूने उभे आहेत.
नुकत्याच झालेल्या तेरखेडा विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या निवडणूकीत सर्व राजकीय पक्षांच्या एकजूट पॅनल विरोधात भाजपा पॅनल उभे करून एकट्याने कडवी झुंज देणाऱ्या प्रविण बप्पा घुले यांचा सर्वपक्षीय स्थानिक नेत्यांसह त्यांच्या वरिष्ठांनीही चांगलाच धसका घेतलेल्याचे दबक्या आवाजात बोलले जात आहे. तसेच भाजपकडून देखील आपल्यालाच संधी मिळणार असल्याचा विश्वास प्रवीण घुले व त्यांच्या कार्यकर्त्यांना असून पक्ष नेमकी काय भूमिका घेतो हे येणाऱ्या काही दिवसातच स्पष्ट होणार आहे


