कर्जमुक्ती योजनेंतर्गत तामलवाडी आणि पाथरूड येथे आधार प्रमाणीकरणास प्रारंभ
जिल्ह्यातील ७६ हजार ४३७ शेतकऱ्यांच्या याद्या २८ फेब्रुवारी पर्यंत उपलब्ध होतील -जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे
तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी आणि भूम तालुक्यातील पाथरूड येथे आधार प्रमाणीकरणाच्या पथदर्शी योजनेचा शुभारंभ
उस्मानाबाद, ( दि.२४ ) : महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी आणि भूम तालुक्यातील पाथरूड येथील थकबाकीदार शेतकरी सभासदांचे आधार प्रमाणीकरण करून या योजनेचा शुभारंभ जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांच्या हस्ते करण्यात आला.
जिल्ह्यातील ७६ हजार ४३७ पात्र शेतकऱ्यांच्या याद्या २८ फेब्रुवारी २०२० पर्यंत उपलब्ध होतील, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या शुभारंभ प्रसंगी जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी आणि भूम तालुक्यातील पाथरूड येथील थकबाकीदार शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण करून घेण्याच्या प्रक्रियेची आज सुरुवात करण्यात आली.
तामलवाडी येथील तामलवाडी विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी लिमिटेड येथे आयोजित केलेल्या या कार्यक्रमास जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे, जिल्हा उपनिबंधक विश्वास देशमुख,तहसिलदार सौदागर तांदळे, सहाय्यक निबंधक विद्याधर माने, तामलवाडी गावचे सरपंच ज्ञानेश्वर माळी, उपसरपंच दत्तात्रय वडणे,पंचायत समिती सदस्य दत्तात्रय शिंदे, विविध कार्यकारी सोसायटीचे संचालक मल्लिकार्जुन मसुते, उपाध्यक्ष नानासाहेब पाटील, संचालक शिवदास पाटील, सुलेमान शेख, बलभीम व्हटकर, ग्रामपंचायत सदस्य बापूसाहेब पाटील, ज्येष्ठ तपासणीस, जिल्हा मध्यवर्ती बँक पारवे, तलाठी श्री.शिंदे,जिल्हा मध्यवर्ती बँकेचे शाखाधिकारी श्री.इंगळे, तामलवाडी विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी लिमिटेड चे गटसचिव सुधाकर लोंढे उपस्थित होते.
महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत आज जिल्ह्यात तामलवाडी आणि पाथरूड येथील आधार प्रमाणीकरण व व महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती या पथदर्शी योजनेचे हाती घेतले असून या दोन गावातील थकबाकीदार शेतकऱ्यांच्या याद्या पूर्ण झाल्या असून त्यांच्या आधार प्रमाणीकरणाच्या कामाचा शुभारंभ आज झाला.
तामलवाडी येथील २०२ तर पाथरूड येथील ११० पात्र शेतकऱ्यांची यादी पोर्टलवर असून त्यांचे आधार प्रमाणीकरण केले जाणार आहे. या याद्यांमध्ये काही त्रुटी आढळल्यास त्यांची त्या-त्या स्तरावर लगेचच सुधारणा केली जाईल, असे जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांनी स्पष्ट केले.
यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी आधार प्रमाणीकरणाच्या कामाची पाहणी केली तसेच त्यांच्या हस्ते आधार प्रमाणीकरण केलेल्या शेतकऱ्यांना पोचपावत्यांचे वितरणही त्यांच्या हस्ते करण्यात आले.
*जिल्ह्यातील ७६ हजार ४३७ शेतकऱ्यांच्या याद्या दि.२८ फेब्रुवारी २०२० पर्यंत उपलब्ध होतील - जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे*
महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज असल्याचे स्पष्ट करून जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे म्हणाल्या, या योजनेच्या अंमलबजावणीत कोणत्याही त्रुटी राहू नयेत, यासाठी प्रशासन सतर्क असून जिल्ह्यातील ७६ हजार ४३७ थकबाकीदार शेतकरी सभासदांची जवळपास अंदाजित ७७७ कोटी रूपयांची कर्जमाफी होवून हे शेतकरी कर्जमुक्त होतील. या सर्व शेतकऱ्यांची माहिती पोर्टलवर अपलोड केली असून २८ तारखेपर्यंत याद्या उपलब्ध होतील.
जिल्हा उपनिबंधक विश्वास देशमुख यांनी उपस्थितांना या योजनेची सविस्तर माहिती दिली. जिल्ह्यात आज महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत तामलवाडी आणि पाथरूड येथे पात्र थकबाकीदार शेतकरी सभासदांच्या आधार प्रमाणीकरणाच्या कामाची पथदर्शी प्रक्रिया शासनाने हाती घेतली असून जिल्ह्यातील उर्वरित पात्र थकबाकीदार शेतकरी सभासदांच्या याद्या दि.२८ फेब्रुवारी पर्यंत उपलब्ध केल्या जातील. या याद्या ग्रामपंचायत, तलाठी कार्यालय, विकास सोसायटी तसेच जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संबंधित शाखेत प्रदर्शित केल्या जातील, असेही ते म्हणाले.
तामलवाडी गावचे सरपंच ज्ञानेश्वर माळी, उपसरपंच दत्तात्रय वडणे, पंचायत समिती सदस्य दत्तात्रय शिंदे यांनीही या याेजनेबद्दल समाधान व्यक्त करून गावात या योजनेंतर्गत आधार प्रमाणीकरणाचा शुभारंभ केल्याबद्दल समाधान व्यक्त केले.
नैसर्गिक आपत्तीमुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना शासनाच्या महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेमुळे दिलासा मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
*मी कर्जमुक्त झालो..मी व माझे कुटुंब शासनाचे आभारी आहोत - शेतकरी रहमान पटेल*
महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेमुळे माझे ५४ हजार ११४ रूपयांचे कर्ज माफ होवून मी कर्जमुक्त झाल्याचे समाधान येथील शेतकरी रहमान वजीर पटेल यांनी आधार प्रमाणीकरणानंतर व्यक्त केले. शासनाच्या या कर्जमुक्ती योजनेमुळे मी कर्जमुक्त झालो,हा माझ्यासाठी आणि माझ्या कुटुंबासाठी सर्वात आनंदाचा क्षण असल्याचेही त्यांनी समाधान व्यक्त केले.
तामलवाडी येथील बाळासाहेब जगताप आणि त्यांच्या पत्नी उषा बाळासाहेब जगताप यांनीही आपले १ लाख १७ हजार ८९३ रूपयांचे थकीत कर्ज माफ झाले असल्याबद्दल समाधान व्यक्त करून शासनाचे मनःपूर्वक आभार मानले.
000000