“येरमाळा पोलीसांच्या सतर्कतेने कर्नाटक राज्यातील अपहृत अल्पवयीन मुलीची सुटका”
उस्मानाबाद :- जिल्ह्यातील पोलीस ठाणे, येरमाळा: येरमाळा गावात एक कानडी तरुण एका बुरखाधारी अल्पवयीन मुलीस घेउन संशयास्पद राहत असल्याची गोपनीय खबर येरमाळा पोलीसांना मिळाली होती. यावर पोलीसांनी त्या तरुणास ताब्यात घेउन चौकशी केली असता तो तरुण- परवेज माजीद अन्सारी, वय 22 वर्षे, रा. आळंद, जि. गुलबर्गा, राज्य- कर्नाटक येथील असुन त्याच्या सोबत असणाऱ्या बुरखाधारी अल्पवयीन मुलीस त्याने राहत्या गावातून फूस लाउन पळवून आणले असल्याचे समजले. याबाबतीत गुलबर्गा जिल्ह्यातील आळंद पोलीस ठाणे येथे गु.र.क्र. 156 / 2020 हा भा.दं.सं. कलम- 363 नुसार दाखल असल्याचे समजले.
सदर हकीकत गुलबर्गा पोलीसांना कळवल्यानंतर आज दि. 27.09.2020 रोजी आळंद पो.ठा. चे पथक येरमाळा येथे आले असता त्यांच्या ताब्यात त्या तरुणास व अल्पवयीन मुलीस सुपूर्द करण्यात आले. अशा प्रकारे येरमाळा पोलीसांच्या सतर्कतेमुळे एका अल्पवयीन मुलीच्या अपहरणाचा उलगडा झाला आहे.