सांगवी (का) प्रतिनिधी (भिमा भूईरकर.)
तुळजापूर तालुक्यातील सांगवी (का) व परिसरात रविवारी मध्यरात्री मेघगर्जेनेसह जोरदार वादळी पाऊस झाल्याने खरीप पिकाला जीवदान मिळाले. तर दुसरीकडे ऊसाचे उभे पीक भुईसपाट झाले.
सांगवी (का) येथील शेतकरी महेश शिवाजी मगर यांचा अडीच एकर व याच गावातील शेतकरी विश्वास मधुकर मगर यांचा दोन ऐकर व दीपक शाहजी भुईरकर दोन ऐकर ऊस क्षेत्र वादळी पावसामुळे भुईसपाट झाला आहे. त्यामुळे त्यांचे मोठे नुकसान झाले आहे. अद्याप गळीत हंगाम सुरु नसल्याने पडलेल्या ऊसाला उंदीर लागून मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. महेश मगर यांनी तीन लाख तर विश्वास मगर यांनी दीड लाख रुपये महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा सांगवी का यांचेकडून कर्ज घेतले आहे. आत्ता हे कर्ज फेडयाचे कसे असा मोठा प्रश्न त्यांच्यासमोर उभा आहे .
मागील पंधरा दिवसापासून पावसाने ओढ दिली होती. त्यामुळे हातातोंडाशी आलेले खरीपातील सोयाबीन, तूर, उडीद, मूग आदी पिके सूकून चालले होते. मात्र रात्री झालेल्या पावसाने कांही शेतकरी सुखावले तर दुसरीकडे ऊसाचे मोठे नुकसान झाले आहे. कृषी विभागाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर जावून पंचनामा करुन त्यांना नुकसानभरपाई मिळण्यासाठी प्रयत्न करावे. अशी मागणी पिडीत शेतकरी महेश मगर व विश्वास मगर यांनी उस्मानाबाद न्यूज शी बोलताना केली आहे.