तामलवाडी बॅंक ऑफ महाराष्ट्रचा कारभार रामभरोसे !
शाखाधिकारी दोन महिन्यापासून गायब !
शेतकरी , ग्राहकांची हेळसांड !
सांगवी (का)( प्रतिनिधी भिमा भुईकर )
तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी येथील बॅंक ऑफ महाराष्ट्रचे शाखाधिकारी गेली दोन महिन्यापासून गायब असल्याने शेतकरी ग्राहकांची हेळसांड होत असुन बॅंकेचा कारभार रामभरोसे चालला आहे.
तामलवाडी गाव हे राष्ट्रीय महामार्गावर असलेले मोठे गाव असून गावामध्ये छोटे मोठे कारखाने आहेत तसेच गावामध्ये मोठी बाजारपेठ असल्याने व्यवहार करण्यासाठी गावामध्ये बॅंक ऑफ महाराष्ट्र ही बॅंक गेली अनेक वर्षांपासून कार्यरत आहे.सध्या या बॅंकेचा कारभार रामभरोसे चालला आहे.दोन महिन्यापुर्वी येथील शाखाधिकारी याना कोरोनाची बाधा झाली यातच त्यांची बदली झाल्याचे कळाले. एक महिन्याच्या प्रदिर्घ कालावधीनंतर दुसरे शाखाधिकारी याठिकाणी आले परंतु आल्यावर लगेच तेही कोरोना पाॅझीटीव्ह निघाले पंधरा दिवसाचा कालावधी उलटुन गेला असतानाही शाखाधिकारी येत नसल्याने ग्राहकांची प्रचंड हेळसांड होत आहे.तशी मध्यंतरी एक दोन वेळा शाखाधिकारी यानी हजेरी लावली होती. श्रावणबाळ योजनेच्या पगरीचे चेक आले असूनही शाखाधिकारी नसल्याने लाभार्थ्यांच्या खात्यावर पैसे पडत नाहीत तसेच अनेक प्रकारचे कर्ज मागणीची व इतर प्रकरणे रेंगाळली आहेत.दि.१५ रोजी बॅंकेत जाऊन चौकशी केली असता सोलापूर येथील एका शाखेचे शाखाधिकारी तात्पुरते दोन दिवसाकरीता कामासाठी आलेले आढळून आले परंतु दोन दिवसानंतर बॅंकेत शाखाधिकारी येतील का? असा प्रश्न ग्राहकांना पडत आहे. बॅंकेमधील कर्मचारीही ग्राहकांना नीट वागणूक देत नाहीत, व्यवस्थितपणे बोलत नाहीत तसेच आतमधील प्रिंटर मशीन कायम बंद असल्याचे सांगण्यात येते उद्या या, परवा या असे सांगून ग्राहकांना बाहेर काढले जाते अशा अनेक तक्रारी ग्राहकांनी उस्मानाबाद न्यूज शी बोलताना सांगितल्या.या बॅंकेमध्ये अगोदरच कमी कामगारावर काम चालते अशातच शाखाधिकारी दोन दोन महीने येत नसल्याने बॅंकेचा कारभार हा रामभरोसे चालला आहे असे मत बँकेच्या ग्राहकांनी व्यक्त केले. लवकरात लवकर शाखाधिकारी पुर्ववत देऊन ग्राहकांची होणारी हेळसांड थांबवावी अशी मागणी शिवसेवक समितीचे जिल्हा कार्याध्यक्ष सर्जेराव गायकवाड यांनी उस्मानाबाद न्यूज शी बोलताना केली आहे.