माझा मराठीची बोलू कौतुके - लेख

0
माझा मराठीची बोलू कौतुके - लेख 


 कवीवर्य कुसुमाग्रज उर्फ विष्णू वामन शिरवाडकर यांची आज जयंती . कविवर्य कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस मराठी राजभाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो . मराठी भाषेच्या उत्पत्तीचा आढावा घेत असताना आणि सद्यस्थितीतील मराठी भाषेची स्थिती यावर भाष्य करत असताना मराठी भाषेने आजपर्यंत अनेक आक्रमणे पचवली आहेत . अनेक संकटातून तावून-सुलाखून आजही मोठ्या थाटामध्ये मराठी भाषा अभिमानाने जगभरात सर्वदूर पसरलेली दिसून येते . मराठी भाषेच्या उत्पत्तीचा विचार केला तर असे दिसून येते की, श्रवणबेळगोळ येथील शिलालेख हा ९८३ या कालखंडातील असून त्यावर "श्री चावुन्डराजे करविले श्री गंगराजे सुत्ताले करविले"  असा मराठी भाषेतील उल्लेख आपल्याला दिसून येतो . तसेच अक्षी येथील शिलालेख ९३४ या कालखंडातील  पहिला मराठी कोरीव लेख आपल्याला दिसून येतो.११ व्या शतकात मुकुंराज यांनी 'विवेकसिंधू ' हा ग्रंथ मराठी भाषेत लिहिलेला पहावयास मिळतो .
        १२५० ते १३५० या कालखंडात देवगिरीच्या यादवांचे महाराष्ट्रावर राज्य असल्याने मराठी भाषेला राजभाषेचा दर्जा होता . या काळात कवी , लेखक यांना राजाश्रय दिलेला दिसून येतो . याकाळात वारकरी संप्रदायाची मुहूर्तमेढ रोवली गेली. संत साहित्याने मराठी मनावर अधिराज्य गाजवले.आजही भक्तिभावाने त्याचे वाचन केले जाते .संत ज्ञानेश्वर यांच्या ज्ञानेश्वरीचा उल्लेख अग्रक्रमाने करणे महत्वपूर्ण ठरते .
संत ज्ञानेश्वर माय मराठीचा गोडवा गाताना असे म्हणतात ,"माझा मराठीची बोलू कौतुके 
परि अमृतातेही पैजा जिंके
 ऐसी अक्षरे रसिके मेळविन" १२व्या शतकामध्ये संत ज्ञानेश्वर माय मराठीच्या संदर्भाने अमृतापेक्षा ही गोड असणारी माझी मराठी भाषा सर्वश्रेष्ठ आहे अशी महती गातात . त्याच काळामध्ये संत नामदेव, संत गोरोबा कुंभार ,संत चोखामेळा ,संत बंका महार ,संत सेना न्हावी, संत कान्होपात्रा, संत मुक्ताई ,संत सावता माळी या संतांनी मराठी भाषेमध्ये काव्यरचना केलेल्या दिसून येतात . संत सावता माळी म्हणतात," कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी 
लसूण, मिरची कोथिंबिरी 
अवघा झाला माझा हरी 
मोट, नाडा, विहीर, दोरी 
अवघी व्यापीली पंढरी
 सावता म्हणे केला मळा
 विठ्ठल पायी गोविला गळा"
 अशा पद्धतीने मराठी भाषेचा महिमा सुंदर शब्दात गातात .आज वर्तमान स्थितीमध्ये मोट ,नाडा याच बरोबर अनेक मराठी बोलीतील  शब्द कालबाह्य झालेले दिसून येतात .
               नंतर बहामनी काळ होऊन गेला. या काळात मुस्लिम राजांचे आक्रमणे होत होती. मराठी भाषेऐवजी फारशी भाषा सरकारी भाषा झाली होती. त्यामध्ये तारीख यासारखे अनेक शब्दांचे आगमन मराठीत झाले ,ते शब्द मराठी भाषेत सहजपणे रुळलेले दिसून येतात .या धकाधकीच्या काळात ही नरसिंह ,सरस्वती ,भानुदास ,  जनार्दनस्वामी  ,एकनाथ  दासोपंत ,रंगनाथ, विष्णूदास नामा ,कवी चोंभा यांनी मराठी वाड्मयात भक्तीपर काव्याची भर घातलेली दिसून येते. या काळात हुसेन अंबरखान ,अमलखान ,शेख महंमद या मुस्लिम कवींनी मराठी भाषेत लेखन केले आहे . कमलखान यांनी ," आज मोठा आनंद झाला माय | माझा मज भेटला गुरुराय " असे मराठी भाषेत काव्य लेखन केलेले दिसून येते.
       पेशवे काळ(१७०० ते १८१८) या  कालखंडात मोरोपंत ,श्रीधर हे कवी उदयास आले .राम जोशी, प्रभाकर ,होनाजी बाळा, सगनभाऊ यासारख्या शाहिरांचा उदय झाला . या काळात मराठी भाषेत लावणी , पोवाडे , शाहिरी वाङ्ममय प्रकार निर्माण झाले . तसेच बखर लेखनालाही सुरुवात झाली.
      इंग्रजी राजवटीचा काळ १८१८ पासून सुरुवात झाला . या काळामध्ये गद्यलेखन ,कथा कादंबरी ,कविता ,नाटक,  प्रवास वर्णन या साहित्य प्रकारातील लेखनाला सुरुवात झाली . अनेक नियतकालिके मराठी भाषेत छापली जाऊ लागली याच काळात .पूर्णविराम ,अर्धविराम, प्रश्नचिन्ह ,स्वल्पविराम या चिन्हाने भर घातली आणि मराठी भाषा लिखाण सुखर केले . इंग्रज, फ्रेंच ,पोर्तुगीज ,डच या राजवटी या काळामध्ये स्थापन झाल्या. इंग्रजांनी जवळपास दीडशे वर्षे राज्य केले आणि त्याचा परिणाम मराठी भाषेत इंग्रजी शब्दांची भर पडली . राजन खान  म्हणतात ,"इंग्रजीने मराठीचा स्वीकार केला नाही, परंतु मराठी ने मात्र इंग्रजीचा स्वीकार केला आहे "याचा विचार आपण केला पाहिजे  .    
           कवीवर्य कुसुमाग्रज मराठी भाषेचा गौरव करताना म्हणतात ,"डोक्यावर सोनेरी मुकुट पण अंगावर फाटके कपडे या अवस्थेत मराठी मंत्रालयाच्या दाराशी उभी आहे".अशी शासकीय स्तरावर मराठीची दुरावस्था पहायला मिळते . आज आपण पाहतोय , वर्तमान स्थितीमध्ये कितीही बदल घडले ,परिवर्तन झालं असेल ,अनेक राजवटी बदलून गेल्या असतील, तरीही मराठी भाषा आपलं अस्तित्व टिकवून आहे. आज शासकीय कार्यालय, बँक ,न्यायव्यवस्था, विद्यापीठ , महाविद्यालय, शासनाचे विविध कार्यालय ,इतर कागदपत्रांचा आपण बारकाईने विचार केला तर ती कागदपत्रे इंग्रजीतूनच असलेली दिसून येतात. यामध्ये बदल होणार आहे की नाही ?  याही गोष्टीचे मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने चिंतन होणे गरजेचे आहे . इंग्रजी माध्यमाच्या शाळा गल्लोगल्ली उभारू लागल्या, तरीही घाबरून जाण्याचं काही एक कारण नाही.  कवी कुसुमाग्रज म्हणतात," माय मराठी मरते इकडे 
परकीचे पद चेपू नका
 परभाषेतही व्हा पारंगत ज्ञानसाधना करा तरी 
भाषा मरता देशही मरतो संस्कृतीचाही दिवा विझे
गुलाम भाषिक होवूनी 
आपल्या प्रगतीचे शिर कापु नका" आपल्याला अनेक भाषा आल्या पाहिजेत ,  हे विद्वत्तेचे लक्षण आहे. परंतु इतर भाषेबरोबर आपली मातृभाषा , आपली मायबोली ही आपण विसरता कामा नये. आज लिंग्विस्टिक सर्व्हे ऑफ इंडियाच्या आकडेवारीनुसार १९६१च्या जनगणनेनुसार "भारतात १६५२ भाषा बोलल्या जात होत्या, तर २००१ च्या जनगणनेनुसार भारतात १२२  भाषा व २३४ बोली बोलल्या जातात" आज जागतिकीकरणाच्या रेट्यात किती बोली शिल्लक आहेत याचं चिंतन करण्याची वेळ आली आहे.    वरवट , माळ ,सूरपारंब्या, पिंगा ,मोट ,येटन इ.  मराठी शब्द नामशेष होण्याच्या मार्गावर असलेले दिसून येतात ,त्याचं जतन झालं पाहिजे .यावर चिंतन व्हायला हवं . मराठी भाषेमध्ये अनेक इंग्रजी शब्दांनी भर घातलेली दिसून येते . आज ग्रामीण भागामध्ये आपण जर विचार केला तर भजन, किर्तन, प्रवचन, आरती ,आराध्याची गाणी, गोंधळ  , शेतकरी गीते ,पाळणा,भलरी गीते हे मराठीतूनच गायली जातात ,यापुढेही ती मराठी भाषेतूनच गायली जाणार आहेत ,यात शंका घेण्याचं कारण नाही .जात्यावरील ओव्या  काळाच्या ओघात मागे पडलेल्या दिसून येतात. ग्रामीण भागातील कष्टकरी वर्ग, कामगार ,शेतकरी, शेतमजूर यांच्या तोंडी असणारी अस्सल ग्रामीण मराठी बोली आजही तितक्याच आनंदाने डोलते आहे .सुशिक्षित व्यक्तीने ती बोली कमी प्रतीची आहे  हे समजणे चुकीचे आहे . आपली बोली भाषा टिकली पाहिजे .  इंग्रजी बोलणे म्हणजे प्रतिष्ठेचे आणि मराठी बोलणे हे अप्रतिष्ठेचे ,कमीपणाचे  समजले जाऊ नये ,याचाही कुठेतरी विचार यानिमित्ताने  झाला पाहिजे.
आजही  मराठी भाषेच्या अस्तित्वाविषयी  वेगवेगळ्या सभा संमेलनामध्ये , तिच्या भवितव्याविषयी गरळ ओकली जाते. मराठी भाषेचे अस्तित्व धोक्यात आहे .भविष्यात मराठी भाषा जिवंत राहील की नाही?जागतिकीकरणात मराठी भाषेचे अस्तित्व संपूष्टात येईल ? हे  वाक्य प्रयोग ,शब्दप्रयोग सुजाण आणि सुशिक्षित व्यक्ती वेगवेगळ्या व्यासपीठावरून शब्दबद्ध करत असलेल्या आपणास दिसून येतात.हे जरी काही प्रमाणात खरे असले तरी, जोपर्यंत आपला देश कृषिप्रधान देश आहे .या देशात कृषी व्यवस्था जीवंत आहे .  जोपर्यंत या देशात खेडी आपलं अस्तित्व टिकून राहणार आहेत . खेड्यातील माणूस जिवंत आहे ,तोपर्यंत ग्रामीण माणूस माय मराठीला सोबत घेऊन जीवन जगत असलेला आपणास पहायला मिळेल. यात शंका करण्याचं काही कारण नाही. आज मराठी भाषा जगभरात वेगवेगळ्या परदेशात विखुरली गेलेली  आपल्याला दिसून येते .  परदेशात मोठ्या संख्येने मराठी भाषिक  वास्तव्य करताहेत  आणि मराठी भाषेच्या वृद्धीसाठी प्रयत्न करताना आपणाला दिसून येतात. रवींद्रनाथ टागोर मातृभाषेविषयी असं म्हणतात ,"मातृभाषेतून शिक्षण देणे आणि आईच्या दुधावर मुलाचे पोषण होणे या दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत". म्हणजेच  बालपणापासून शिक्षण  मातृभाषेतूनच दिलं गेलं पाहिजे , तरच मायबोली हृदयात रुजलेली पहायला मिळेल. आज आपण दैनंदिन अवतीभवती पहात आहोत . सकाळी झोपेतून उठल्या बरोबर आपल्या दारामध्ये मराठी वर्तमानपत्र आलेले दिसून येते .महाराष्ट्र टाइम्स ,लोकसत्ता, लोकमत ,सकाळ, पुण्यनगरी, एकमत, पुढारी ,संघर्ष या बरोबर स्थानिक वर्तमानपत्रे, साप्ताहिके ,मासिके  वाचन करणारा वर्ग मोठ्या प्रमाणात आहे आणि भविष्यात तो असणारही आहे . लाखोंच्या संख्येने मराठी वर्तमानपत्र छापली जातात , वाचणारा वर्ग आहे म्हणूनच .मराठी भाषेत पुस्तके प्रकाशित करणाऱ्या प्रकाशन संस्था ,मराठी भाषेविषयी वेगवेगळे शासनाचे उपक्रम ,मराठी भाषेच्या वाढीसाठी वेगवेगळ्या व्यासपीठावर होणारे कार्यक्रम हे  मराठी भाषा वृद्धीसाठी उपयुक्त आहेतच. तसेच मराठी चित्रपटाने सातासमुद्रापलिकडे आपले अस्तित्व सिद्ध केले आहे . आज अनेक मराठी चित्रपट परदेशातही प्रदर्शित झालेले दिसून येतात. मराठी गाणी ,अभंग ,ओव्या ,पोवाडे , कविता या विषयाच्या अनुषंगाने सातत्यपूर्ण वेगवेगळ्या व्यासपीठावर, कार्यक्रमात चर्चा होताना दिसून येते .ती मराठीच्या भरणपोषणासाठी आवश्यकच आहे. आज आपण चुकीच्या पद्धतीने प्रत्येक जण मोठ्या अविर्भावात मराठी भाषा मरणपंथाला लागली आहे, असे बोलू लागतो . परंतु हे चुकीचं आहे . मराठी भाषेचा इतिहास दोन-अडीच हजार वर्षांपूर्वीचा  आहे. मराठी भाषेने अनेक आक्रमणे सहन केली आहेत. अनेक संकट संकटातून तावून सुलाखून  सुध्दा थाटात ती आज उभी असलेली आपणास दिसून येते . भारतामध्ये वेगवेगळ्या राज्यात विविध विद्यापीठांमध्ये मराठी भाषा शिकवली जाते. त्यामध्ये आंध्रप्रदेश राज्यात उस्मानिया विद्यापीठ, हैदराबाद या ठिकाणी, कर्नाटक विद्यापीठातील अनेक महाविद्यालयांमध्ये, राणी चन्नम्मा विद्यापीठ बंगळूर ,गुलबर्गा विद्यापीठ ,दिल्ली विद्यापीठ, अलीगढ मुस्लिम विद्यापीठ, काशी विश्व हिंदू विद्यालय, बडोदा विद्यापीठ ,गोवा विद्यापीठ, गोव्यातील अनेक महाविद्यालयांमध्ये मराठी भाषा  शिकवली जाते  . आज मराठी राजभाषा दिन अर्थातच कविवर्य कुसुमाग्रज जयंती आपण सर्वदूर साजरी करतो आहोत. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा लवकरच मिळावा .भारतातील सर्व विद्यापीठामध्ये मराठी भाषा शिकवली जावी . महाराष्ट्रातील सर्व शासकीय व्यवहारात मराठी अनिवार्य व्हावी. सर्व महाविद्यालय ,शाळेमध्ये मराठी विषय सक्तीचा असावा . याचाही विचार होणं गरजेचे आहे.
 " विदेशी कपडे घातले तरी हृदय अजून मराठी आहे 
तोडून तुटत नाहीत या मजबूत रेशीम गाठी आहेत 
पिज्जा बर्गर खाल्ल्यावरही 
पोट पुरणपोळीच मागतं 
इंग्रजी वाचली तरीही
 मन हे मराठीसाठी भुकेलं असतं"
 आपण संकल्प करू ,प्रत्येकाने संवाद साधताना मराठी भाषेमध्ये संवाद साधू . इतर भाषा शिकत असताना माय मराठीकडे, मातृभाषेकडे दुर्लक्ष होणार नाही याची   सर्वजण काळजी घेऊ . मराठी राजभाषा गौरव दिनाच्या  ( कविवर्य कुसुमाग्रज जयंतीच्या) सर्व मराठी भाषिकांना शुभेच्छा देतो ,धन्यवाद ....
प्रा.डॉ.तुळशीराम उकिरडे
 सहाय्यक प्राध्यापक,
मराठी विभाग ,
तेरणा महाविद्यालय,उस्मानाबाद
9881103941

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top