भांडणापेक्षा समझोता बरा, कौटुंबिक सौख्यातच आनंद खरा - रुपाली मोहिते

0
भांडणापेक्षा समझोता बरा, कौटुंबिक सौख्यातच आनंद खरा -    रुपाली मोहिते


उस्मानाबाद,दि.2(जिमाका):- सध्या समाजात कौटुंबिक वादाचे प्रमाण वाढले असून त्यामुळे कौटुंबिक न्यायालयात मोठ्या प्रमाणात प्रकरणे दाखल होत आहेत. वर्ष २०२२ च्या सुरुवातीस उस्मानाबाद कौटुंबिक न्यायालयात 527 प्रकरणे प्रलंबित होती. जानेवारी 2022 ते डिसेंबर 2022 या कालावधीत एकूण 323 प्रकरणे दाखल करण्यात आली. त्यापैकी एकूण 459 प्रकरणांचा निपटारा करण्यात आला. उस्मानाबाद कौटुंबिक न्यायालयाचे कार्यक्षेत्र हे उस्मानाबाद शहर आणि संपूर्ण उस्मानाबाद तालुका असे आहे. कौटुंबिक न्यायालयात येणाऱ्या प्रकरणांची हाताळणी करताना नात्यातील संवेदनशिलता ही जोपासावी लागते. या प्रकरणांमध्ये न्यायालयाकडून प्रामुख्याने समेट घडवून आणण्याचा यथोशिखर प्रयत्न केला जातो. यासाठी न्यायाधीश आणि न्यायालयातील सर्व कर्मचारी प्रयत्न करतात. न्यायालयीन प्रक्रीयेमध्ये समुपदेशनाच्या माध्यमातून संसार पूर्ववत रहावा यावर भर दिला जातो.

         कौटुंबिक न्यायालयाचा पाचवा वर्धापन दिन कार्यक्रम आणि मराठी भाषा संवर्धन पंधरवडा नुकताच येथील मध्यवर्ती प्रशासकीय इमारत परिसरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्पाय भवन मधील सभागृहात उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी अध्यक्षीय भाषणात न्यायाधीश श्रीमती रुपाली मोहिते बोलत होत्या.

यावेळी बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाचे अध्यक्ष ॲड.मिलिंद पाटील, जिल्हा विधीज्ञ मंडळाचे अध्यक्ष ॲड.एस.आर.मुंढे, ज्येष्ठ मराठी साहित्यीक, कवी व सुप्रसिध्द चित्रकार प्रा.राजेंद्र अत्रे, कौटुंबिक न्यायालयाचे विवाह समुपदेशक एच.व्ही.भारुडकर, प्रबंधक एस.आर.डोके आदी उपस्थित होते.

       'भांडणापेक्षा समझोता बरा कौटुंबिक सौख्यातच आनंद खरा" हा संदेश देऊन कुटूंब वाचविण्यासाठी पूर्ण प्रयत्न केला जातो. तथापि, ज्या प्रकरणांमध्ये समेट घडून येत नाही अशा प्रकरणांमध्ये परस्पर संमतीने घटस्फोट मंजूर केला जातो अशी 61 प्रकरणे मागील वर्षभरात निकाली निघाली आहेत. फौजदारी  120 प्रकरणे निकाली काढण्यात आली. गेल्या वर्षभरात वैवाहिक हक्काची पुर्नस्थापना करणे, विवाह रद्द करणे आणि घटस्फोट अशी 339 प्रकरणे निकाली काढण्यात आली आहेत. त्यापैकी 73 प्रकरणांत दोन्ही बाजूत समेट होऊन संसार पुन्हा जुळले, असेही यावेळी श्रीमती मोहिते यांनी सांगितले.

         न्यायालयीन व शासकीय कामामध्ये गती आल्यामुळे कौटुंबिक न्यायालया वरील विश्वास दिवसेंदिवस वृध्दींगत होत आहे. वर्षभरात 17 प्रकरणांत पोटगी मंजूर करण्यात आली आहे. ज्यांनी पोटगी देताना विलंब केला अशांना नोटीस, जामीनपात्र वॉरंट, अटक वारंट जारी केले जाते. यामुळे महिलांना नियमित पोटगी मिळते. न्यायालयातील प्रकरणे जलदगतीने निकाली निघत आहेत. लोकन्यायालयात 15 प्रकरणात तडजोड होऊन पुन्हा संसार फुलला आहे. पाच वर्षे जुनी सर्व दिवाणी  प्रकरणे न्यायालयाकडून निकाली काढण्यात आली आहेत. याकरीता कौटुंबिक न्यायालयाच्या न्यायाधीश रुपाली विश्वास मोहिते, विवाह समुपदेशक एच.व्ही. भारुडकर, वकील संघाचे अध्यक्ष एस. आर. मुंढे आणि सर्व वकिलांचे सहाकार्य मिळाले आहे.

        तत्पूर्वी सुरुवातीस प्रमुख पाहुणे व न्यायाधीश श्रीमती  रुपाली मोहिते यांच्या हस्ते दीप प्रज्वलन आणि सरस्वती पूजन करण्यात आले. स्वागत गीत कु. प्रज्ञा उर्फ यशश्री अत्रे यांनी सादर केले.

         मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त ज्येष्ठ मराठी साहित्यीक व चित्रकार प्रा.राजेंद्र अत्रे यांनी मार्गदर्शन केले. मराठी भाषेचा इतिहास, मराठी भाषा संवर्धित होणे का गरजेचे आहे, मराठी भाषा वाढवणे आणि टिकविण्यासाठी काय करावे लागेल याबद्दल प्रा.अत्रे यांनी मार्गदर्शन केले. तसेच ॲड.मिलिंद पाटील आणि ॲड.एस.आर.मुंढे यांनीही यावेळी मागदर्शन केले.

       कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ॲड.एस.बी.माढेकर यांनी केले. प्रास्ताविक विवाह समुपदेशक एच.व्ही.भारुडकर यांनी केले तर आभार प्रदर्शन कौटुंबिक न्यायालयाचे सहायक अधीक्षक पी.टी.जाधव यांनी केले.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top