रक्षाबंधन : एक अतुट नाते बहिण-भावाचे
राखीपौर्णिमा अर्थात रक्षाबंधन हा भावाबहिणींचा सण म्हणून ओळखला जातो. बहीण भावाला राखी बांधते. राखी अर्थात हा नक्कीच साधासुधा धागा नाही. यामागे असणाऱ्या भावना अत्यंत वेगळ्या आहेत. भावाने बहिणीला तिच्या रक्षेचे दिलेले वचन हे खूपच महत्त्वाचे असते. दरवर्षी साधारण ऑगस्ट महिन्यामध्ये रक्षाबंधन येते. हिंदूंच्या पंचांगानुसार श्रावण महिन्यामधील पौर्णिमेला हा सण साजरा केला जातो.
‘रक्षाबंधन’ हा सण आपल्याकडे भारतीय संस्कृतीच्या प्रमुख सणामध्ये साजरा करण्यात येतो. भावा-बहिणीचा स्नेह, प्रेम आणि उत्सव अशा मिश्र भावनांचा हा सण आहे. देशभरात हा सण वेगवेगळ्या नावाने खरं तर ओळखला जातो. उत्तर भारतामध्ये ‘कजरी-पौर्णिमा, पश्चिम भारतामध्ये ‘नारळी पौर्णिमा या नावाने हा सण साजरा करण्यात येतो. राखी या शब्दामध्ये रक्षण कर म्हणजेच राख – सांभाळ कर असा संकेत देण्यात आला आहे.त्यामुळेच हा अर्थ लक्षात घेता या दिवशी प्रेमाचा रेशमी धागा आपल्या कर्तबगारी भावाच्या मनगटावर बांधून त्याच्याकडून रक्षणाचे वचन अर्थात रक्षणाचे अभय घेणे, अशी ही अप्रतिम प्रथा आहे. नात्याचे रक्षण करणे हाच यामागील उद्देश आहे.
आपण अनेकदा पाहतो की, बऱ्याचदा बहीण मोठी असते, ती आपल्या भावाचे रक्षण करते, ती स्वतःचे रक्षण करण्यासाठीही समर्थ असते. पण स्त्री कितीही कमावती, मोठी असली तरीही तिचा तिच्या भावावर असणारा विश्वास या राखीमधून दिसून येतो. यामध्ये तिचा दुबळेपणा नाही तर तिचा तिच्या भावाच्या कर्तृत्वावर जास्त विश्वास असतो आणि हेच त्यांच्या नात्यातील आपलेपण जपण्यासाठी राखीपौर्णिमा साजरी करण्यात येते. या नात्यामागची हीच खरी पवित्र भावना आहे. त्यामध्ये कोणतीही फसवणूक नाही. भावाबहिणीचे नाते हे भांडणाचे, खोडीचे तरीही तितक्याच प्रेमाचे असल्याने हा केवळ धागा नसून त्या धाग्याला नात्याचे महत्त्व आहे. या नात्याची कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस आहे. असा हा रक्षाबंधनाचा दिवस जगभरात साजरा करण्यात येतो. इतकंच नाही तर काही ठिकाणी नोकर आपल्या मालकांना आणि गरीब लोक आपले पोषण करणाऱ्या धनवंतांनाही राखी बांधून हा सण साजरा करतात. आपल्या रक्षणाची आणि कुटुंबीयांची जबाबदारी आपल्यावर आहे, अशी कृतज्ञता यातून व्यक्त करण्यात येते. सहसा ही पद्धत उत्तर भारतामध्ये दिसून येते. आता तर नक्कीच काळ पूर्णतः बदलला आहे. भाऊ-बहिणीच्या अतूट प्रेमाचे, त्यांच्या नात्याचे आणि बंधनाचे धागे अजूनही तितकेच घट्ट असले तरीही आता गोष्टींमध्ये बराच फरक पडला आहे. बहीण आपल्या भावाच्या उजव्या हातावर राखी बांधते आणि भाऊ आपल्या बहिणीच्या रक्षणाचे दायित्त्व स्वीकारतो. काळ कितीही बदलला असला तरीही आजच्या काळातही भावा-बहिणीच्या या प्रेमाच्या ‘रक्षाबंधन’ या सणाचे महत्त्व कायम आहे. आता तर सोशल मीडियाच्या युगात वेगवेगळ्या पद्धतीने रक्षाबंधन शुभेच्छा संदेशही पाठवले जातात.
राखी हातावर बांधण्यामागे शास्त्र असल्याचे सांगण्यात येते. आपल्याकडे भारतीय परंपरेत अनेक शास्त्रे सांगितली जातात. सणवार साजरी करण्यामागे अनेक भावनांप्रमाणे शास्त्रेही असतात. त्यापैकीच हे एक शास्त्र आहे. रक्षाबंधनाच्या दिवशी यमलहरींचे प्रमाण अधिक असते असे सांगण्यात येते. यमलहरी या पुरूषांच्या देहामध्ये जास्त प्रमाणात गतीमान होतात असा समज आहे. त्यामुळे या यमलहरी देहात चालू झाल्या की, सूर्यनाडी जागृत होऊन त्यांच्या जीवाला त्रास होतो. पण त्याचवेळी राखीचा धागा बांधून या यमलहरींना बंधन घालण्याचे काम बहिणी करतात असे मानले जाते. त्यामुळे एका अर्थी बहिणी आपल्या भावाच्या जीवाचे रक्षण करत असतात असे शास्त्र सांगते. राखीचे बंधन घालून या सूर्यनाडीला शांत करण्याचे काम बहिणी करतात असे शास्त्रात सांगण्यात आले आहे.
सर्वांना रक्षाबंधनाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा!
श्रीकांत चंद्रकांत देशमुख ,
जिल्हा माहिती कार्यालय,
उस्मानाबाद