उस्मानाबाद:दि.15 (जिमाका):- जिल्ह्यातील कन्टेन्मेंट झोनच्या बाहेरील क्षेत्रातील धार्मिक स्थळे व प्रार्थनास्थळे यांचे ट्रस्ट/बोर्ड/नियामक प्राधिकरण यांनी निश्चित केलेल्या वेळेनुसार ती धार्मिक स्थळे व प्रार्थनास्थळे नागरिकांसाठी खुली करण्यास दि. 16 नोव्हेंबर 2020 पासून परवानगी राहील. याठिकाणी नाकावर व तोंडावर मास्क/स्वच्छ रुमाल बांधणे, सामाजिक अंतराचे पालन करणे, थर्मल स्कॅनिंग, वारंवार हात धुणे (hand wash) अथवा सॅनिटायर्झसचा वापर करणे बंधनकारक राहील. धार्मिक स्थळे / प्रार्थनास्थळे याठिकाणी कोविड-19 चा प्रादुर्भाव रोखण्याचे अनुषंगाने प्रतिबंधात्मक उपाययोजनां (SOP) चे पालन करणे आवश्यक राहील. संबंधित स्थानिक प्राधिकरणास संबंधित व्यवस्थापकांशी विचारविनिमय करुन स्थानिक परिस्थितीचा विचार करता या आदेशातील नमूद मार्गदर्शक सूचना/प्रतिबंधात्मक उपाययोजनांमध्ये नवीन मार्गदर्शक सूचना / प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा समावेश करता येईल.
याचबरोबर सामाजिक अंतर व कोविड-19 चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महाराष्ट्र शासनाने व जिल्हाधिकारी कार्यालयाने वेळावेळी दिलेल्या सर्व प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे पालन करणे बंधनकारक राहील.सदर आदेशाची अंमलबजावणी दिनांक 16.11.2020 पासून तात्काळ लागू करण्यात येत आहे.असे जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष
कौस्तुभ दिवेगावकर यांनी कळविले आहे.