उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोना -19 लसीकरणाची रंगीत तालीम यशस्वी
उस्मानाबाद,दि.08( प्रतिनिधी ): कोरोना लस देण्याची मोहिम देशभरात लवकरच हाती घेतली जाण्याची शक्यता आहे.जिल्हयातील आरोग्य यंत्रणेची याबाबत तयारी पूर्ण झाली आहे.राज्य शासनाच्या सूचनेनुसार आज जिल्हयात तीन ठिकाणी प्रशासनातील वरिष्ठ अधिकऱ्यांच्या उपस्थित या लसीच्या रंगीत तालीम ड्रायरन यशस्वीरित्या पार पडले.
उस्मानाबाद शहरातील जिल्हा सामान्य रुग्णालयात जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांची प्रमुख उपस्थित होती. त्यांच्या उपस्थितीत या लसीकरणाच्या ड्रायरन रंगीत तालमीत कोविन ॲपवर नोंद केलेल्या 25 जाणांना बोलावण्यात आले होते.राज्य शासनाच्या निर्देशाप्रमाणे प्रतिक्षागृह, कोरोना लस देण्याचा कक्ष, आणि देखभालीसाठीचा कक्ष स्थापन करण्यात आला होता.तज्ज्ञ डॉक्टर आणि इतर कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती. सामान्य रुग्णालयात यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. डी.के.पाटील, अतिरिक्त शल्यचिकित्सक डॉ.सचिन देशमुख, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.सचिन बोडके, डॉ.आय.के.मुल्ला आदी उपस्थित होते.
जिल्हयातील जेवळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्र, आणि सास्तूर येथील ग्रामीण रुग्णालयातही रंगीत तालीम घेण्यात आली. या दोन्ही ठिकाणी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विजयकुमार फड उपस्थित होते. तसेच यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.एच. व्ही. वडगावे, उमरग्याचे उपविभागीय अधिकारी विठठल उदमले, लोहाऱ्याचे तहसीलदार रोहन काळे, लोहाऱ्याचे गटविकास अधिकारी एस.ए. अकेले, सहायक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.मिटकरी आदी उपस्थित होते. जिल्हयातील शासकीय,खाजगी क्षेत्रातील डॉक्टर, आरोग्य सेवेशी संबंधित इतर कर्मचारी तसेच अंगणवाडी सेविका आणि मदतनीस अशा एकूण आठ हजार 272 जणांनी कोविन ॲपवर नोंदणी केली आहे.त्या सर्वांनी ही लस घेण्यास सहमती दर्शविली आहे. दरम्यान,आजच्या रंगीत तालमीच्या वेळी उमरगा- लोहाऱ्याचे आमदार ज्ञानराज चौगुले यांनीही भेट देऊन पाहणी केली.
****