अंधारातून प्रकाशाकडे : मतभेद असू द्या, मनभेद नको :- नौशाद उस्मान

0
अंधारातून प्रकाशाकडे : मतभेद असू द्या, मनभेद नको :-  नौशाद उस्मान

उस्मानाबाद, दि. 1 (प्रतिनिधी)- भारत हा बहुसंस्कृतीचा देश आहे. इथे धर्म, जात, विचारधारा, खान-पान, इत्यादी प्रत्येक बाबतीत विविधता आढळते. ही विविधताच या देशाची शान आहे. मतभेद असणे साहजिक आहे, परंतु मतभेदामुळे मनभेद होता कामा नये, असे मत नौशाद उस्मान यांनी जमात-ए-इस्लाम हिंदच्या अंधारातून प्रकाशाकडे या मोहिमेच्या समारोपप्रसंगी व्यक्त केले.
जमात-ए-इस्लाम हिंदच्या उस्मानाबाद शाखेच्यावतीने राज्यव्यापी अंधारातून प्रकाशाकडे ही मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेचा 22 जानेवारी रोजी शुभारंभ झाला होता. या मोहिमेचा समारोप उस्मानाबाद येथील औषधी भवन येथे 30 जानेवारी रोजी झाला. या समारोप कार्यक्रमात नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर, नाना घाटगे, माजी नगराध्यक्ष नानासाहेब पाटील, आशिष मोदाणी, मसूद शेख, नायब तहसीलदार मुस्तफा खोंदे उपस्थित होते.
पुढे बोलताना नौशाद उस्मान म्हणाले की, एक दुसर्‍याच्याप्रति घृणा, तिरस्कार आणि गैरसमज निर्माण करणार्‍या प्रवृत्तींना आपल्या समाजाने नाकारले पाहिजे. प्रेम, सद्भावना आणि एक दुसर्‍याविषयी विश्वास निर्माण करण्याची आज समाजाला गरज आहे. आपले नाते हे रक्ताचे असून आपण आपापसात भावंडे आहोत. अनैतिकता, अज्ञान आणि अराजकतेच्या अंधारातून बाहेर पडण्याकरिता परमेश्वराने दाखविलेला मार्ग आपल्याला मार्गदर्शक ठरेल.
याचवेळी नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर यांनीही मनोगत व्यक्त केले. ते म्हणाले की, निवडणूकीच्यावेळी मतदान करताना लोक स्वच्छ प्रतिमा असलेल्या आणि विकासाची कामे करणार्‍या नेत्यांना विसरून आपल्या वाढदिवसाला किंंवा बारशाला आलेल्या नेत्याला मतदान करतात. अवास्तव अनैतिक, बेकायदेशीर कामाची अपेक्षा या नेत्यांनी पूर्ण करण्याची अपेक्षा बाळगतात. त्यामुळेच राजकारण आपल्याला गढूळ झाल्याचे दिसते. तरूणांनी भावनिक व धार्मिक राजकारण न करता विकासासाठी पाठपुरावा करावा, असे राजेनिंबाळकर यांनी सांगितले.
याप्रसंगी माजी नगराध्यक्ष नानासाहेब पाटील, मुस्तफा खोंदे, नाना घाटगे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन साहेबलाल तांबोळी व आभार रियाज शेख यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी एसआयओ जमात-ए-इस्लाम हिंदच्या सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top