यंदा खरीप हंगामातील सोयाबीन बियाणाच्या दरवाढीची शेतकऱ्यांना चिंता
तुळजापूर / चिवरी : कधी नव्हे ते यावर्षी सोयाबीनच्या बाजारभावाने उच्चांक गाठला असला तरी याचा अधिक अधिक फायदा व्यापाऱ्यांनाच मोठ्या प्रमाणात झाला आहे. या वर्षी सात ते आठ हजार प्रति क्विंटलपर्यंत सोयाबीनचे भाव गेल्याने खरीप हंगामात सोयाबीन बियाणे च्या किमती वाढण्याची चिंता शेतकऱ्यांना लागली आहे. महाबीज कंपनीने जुनेच दर कायम ठेवण्याची घोषणा केली असल्याने इतर खाजगी कंपन्यांनी ही हाच आदर्श घेऊन शेतकऱ्यांना दिलासा देण्याची मागणी होत आहे. मागील दोन वर्षापासून जिल्ह्यामध्ये समाधानकारक पाऊस होत असल्याने शेतमालाचे उत्पादन वाढल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळत आहे. मराठवाड्यासह उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये सोयाबीनचे मोठ्या प्रमाणावर पीक घेतले जाते. दर वर्षी सोयाबीन अडीच हजार ते चार हजार रुपयांच्या दरम्यान विक्री होत असते यंदा मात्र, कधी नव्हे ते सोयाबीनच्या बाजार भावाने विक्रम करत तब्बल सात हजार ते आठ हजार प्रति क्विंटलपर्यंत बाजी मारली होती. हंगामाच्या शेवटी सोयाबीनच्या दरवाढीचा फायदा शेतकऱ्याला कमी अन्, व्यापाऱ्यांनाच मोठ्या प्रमाणात झाल्याचे दिसून येत आहे. सोयाबीनच्या विक्रमी भाववाढीमुळे यंदा बियाणांची किमती वाढण्याची शेतकऱ्यांना चिंता लागली आहे . खरीप हंगाम सुरू व्हायला जेमतेम पंधरा दिवसाचा कालावधी राहिला असल्याने शेतीच्या मशागतीच्या कामांना वेग आला आहे. पावसाळा जवळ आला असल्याने अनेक शेतकरी बियाण्यासाठी च्या पैशाची जुळवाजुळव करत असल्याचे दिसत आहेत. या वर्षी सोयाबीन भाव खाऊन गेल्याने पेरणीच्या वेळी बियाणाचा किमती वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यातच यंदा महाबीज कंपनीने सोयाबीन बियाण्याची दर जैसे थे ठेवण्याची घोषणा करून शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे.
बातमी संकलन :- रूपेश डोलारे तुळजापूर उस्मानाबाद