उस्मानाबाद शहरातील शिवभोजन केंद्रांवर अचानक जिल्हा पुरवठा अधिकारी यांची पाहणी
Shivbhojan Kendra 5 in Osmanabad city
उस्मानाबाद :- कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे मजूर, स्थलांतरित, बेघर तसेच बाहेरगावचे विद्यार्थी इत्यादींना जेवणाआभावी हाल-अपेष्टा सहन करावे लागू नये यासाठी शिवभोजन थाळी लाभार्थ्यांना निशुल्क उपलब्ध करून देण्याचा निर्णय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे.
त्याअनुषंगाने दि.15 मे 2021 पर्यंत शिवभोजन थाळीचे मोफत वितरण गरीब व गरजू व्यक्तींना करण्यात येत आहे. उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये 12 शिवभोजन केंद्रामार्फत प्रतिदिन 1875 शिवभोजन थाळीचे वितरण करण्यात येत आहे.
उस्मानाबाद जिल्हा मुख्यालयी 5 शिवभोजन केंद्र सुरू आहेत 1) शिवदीप उपहारगृह मध्यवर्ती प्रशासकीय इमारत (150 थाळी), 2) बस स्थानक उपहारगृह(150 थाळी), 3) सप्तश्रृंगी ब.सा. संस्था उस्मान टी हाऊस (150 थाळी),4) हॉटेल सिद्धांत मारवाड गल्ली शासकीय रुग्णालया जवळ (150 थाळी), राणाजी भोजनालय काँग्रेस भवन शासकीय रुग्णालया जवळ(150 थाळी), या ठिकाणी सुरू आहेत.
तसेच हॉटेल न्यु सागर बस स्थानका समोर तुळजापूर(165 थाळी), हॉटेल रामकृष्ण उमरगा(180 थाळी), हॉटेल संदेश लोहारा(150 थाळी), हॉटेल माऊली वाशी(150 थाळी), लक्ष्मी भोजनालय कळंब(180 थाळी) हे शिवभोजन जिल्ह्यातील 7 तालुका मुख्यालयी सुरू आहेत.
उस्मानाबाद शहरातील 5 शिवभोजन केंद्रावर दि.01 मे 2021 रोजी सकाळी 09 ते 10.30 वा. दरम्यान डॉ. चारुशीला देशमुख जिल्हा पुरवठा अधिकारी, राजाराम केरुलकर नायब तहसीलदार (पुरवठा) तहसील कार्यालय उस्मानाबाद व पुरवठा विभागातील कर्मचारी यांनी अचानक भेट देऊन सदर शिवभोजन केंद्राची तपासणी केली. शिवभोजन केंद्र चालकांना कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या अनुषंगाने शासनाकडून व प्रशासनाकडून देण्यात आलेल्या सर्व नियमांचे पालन करून गरीब व गरजू व्यक्तींना मोफत शिवभोजन थाळी उपलब्ध करून देण्याबाबत सूचना दिल्या.
महाराष्ट्र शासनाची अधिसूचना दि.20 एप्रिल 2021 मध्ये नमूद करण्यात आलेल्या अत्यावश्यक सेवा सकाळी 7 ते 11 पर्यंत चालू ठेवणेबाबत आदेशित करण्यात आलेले आहे. त्यामुळे शिवभोजन थाळीचे वितरण सकाळी 7 ते 11 या कालावधीत करण्यात येत आहे.
त्याअनुषंगाने सदर योजनेचा सर्व पात्र लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी केले आहे.