तुळजापुर पंचायत समिती उपसभापतीपदाचा दत्तात्रय शिंदे यांनी स्वीकारला पदभार; पहिल्या दिवशीच अधिकारी, कर्मचारी यांना गुलाबाने सन्मान करुन केली सहकार्याची अपेक्षा
सांगवी (का).प्रतिनिधी
पंचायत समितीचे उपसभापती शरद जमदाडे यांनी आपल्या उपसभापती पदाचा राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या तुळजापूर पंचायत समितीच्या उपसभापतीपदाच्या निवडीसाठी शुक्रवार दि. 23 रोजी पंचायत समितीच्या सभागृहात झालेल्या विशेष सभेत तुळजापुर तालुक्यातील तामलवाडी गणाचे पंचायत समितीचे सदस्य तथा आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचे विश्वासू व कट्टर समर्थक दत्तात्रय भास्कर शिंदे यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची तुळजापूर पंचायत समितीच्या उपसभापतीपदी बिनविरोध निवड करण्यात आली होती.
सोमवारी दत्तात्रय शिंदे यांनी आपल्या उपसभापतीपदाचा कार्यभार स्वीकारला. त्यांनी पहिल्याच दिवशी पंचायत समितीमधील सर्व अधिकारी, कर्मचारी यांना बोलावून त्यांचा सत्कार स्विकारण्याऐवजी त्यांचा गुलाब फुल देऊन सन्मानित करुन पुढील कार्यासाठी सहकार्याची अपेक्षा व्यक्त केल्या.
पंचायत समिती पदाधिकाऱ्यांचे अधिकार गोठविण्यात आल्यानंतर पंचायत समिती गणातील विकास कामांना खिळ बसली. त्यामुळे नुतन पंचायत समिती उपसभापती शिंदे यांनी राज्यभर आंदोलने केली होती. राज्यसरकारने सुध्दा त्यांच्या आंदोलनाची दखल घेतली. आपल्या पदाचा पदभार स्वीकारल्यानंंतर बोलताना नुतन उपसभापती शिंदे म्हणाले की, शासनाच्या सर्व योजना येथील पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेत अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या सहकार्यातून जनतेसाठी राबविण्यात येतील आणि या पदाच्या माध्यमातून त्यांचे गण आणि गटातील प्रश्न सोडवू अशी अपेक्षा व्यक्त केली. व मिळालेल्या संधी सोनं करून आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी टाकलेला विश्वास सार्थ ठरवीन अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
यावेळी सभापती रेणुकाताई इंगोले, पंचायत समिती सदस्य सिद्धेश्वर कोरे, कलसुरे ,भिवा इंगोले यांच्यासह गटविकास अधिकारी मरोड,बांधकाम, शिक्षण,पाटबंधारे, रोहयो विभागातील पंचायत समितीचे सर्व अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.