केंद्र सरकारने ओबीसीसह मराठा समाजाचे आरक्षण मातीत घालण्याचे काम केले - बोरकर
उस्मानाबाद दि.२५ (प्रतिनिधी) - केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशाच्या माध्यमातून १०२ वी घटना दुरुस्ती करून ओबीसी समाजासह मराठा समाजाचे राजकीय आरक्षण संपवून या समाजाला एक प्रकारे मातीत गाडण्याचे काम केलेले आहे. हे धर्मावर संकट असून जेव्हा जेव्हा धर्मावर संकट येईल तेंव्हा तेंव्हा कोणीतरी नवीन जन्म घेईल व त्यास मातीत गाडील असे सांगितलेले आहे. त्यामुळे या भाजप सरकारने ओबीसींचे घालविलेले आरक्षण पुन्हा मिळवून न दिल्यास भाजपला आगामी निवडणुकीत हा समाज मातीत गाडल्याशिवाय राहणार नाही, असा खणखणीत इशारा शंकरराव बोरकर यांनी ओबीसी व्हीजे/एनटी आरक्षण बचाव जागर मेळाव्याप्रसंगी दि.२४ जुलै रोजी दिला.
उस्मानाबाद येथील यशराज लॉन्स येथे ओबीसी व्हीजे/एनटी आरक्षण बचाव जागर मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आ. राजेश राठोड, ओबीसी व्हिजे/एनटी आरक्षण जनजागृती अभियानचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब सानप, राजाभाऊ मुंडे, नवनाथ पडळकर, रामराव वडकुते, प्रा. सुशिलाताई मोराळे, शिवानंद कथले, धनंजय ओंबासे, सुखदेव भालेकर, खलिफा कुरेशी, रंगनाथ दुधाळ, लक्ष्मण माने, धनंजय राऊत, रवी कोरे, पांडुरंग लाटे, सोमनाथ गुरव, बाबा मुजावर, इम्तीहान बागवान, डॉ. नवनाथ दुधाळ, शरद कोळी, सोमनाथ काशीद, अरुण खरमाटे, प्रकाश राठोड, बबनराव तायवाडे, राजेंद्र राख, बाळासाहेब पांचाळ, अक्षय ढोबळे आदीसह मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना बोरकर म्हणाले की, डॉ. मनमोहन सिंग यांच्या काळात ओबीसी समाजाची जनगणना करण्याचा आयोगाने अहवाल दिला होता. त्यानंतर केंद्रीय मंत्री राजनाथ सिंग यांनी देखील ओबीसी समाजाची जनगणना करण्याचे आश्वासन दिले होते. तर तत्कालीन लोकसभेच्या अध्यक्षा सुमित्रा महाजन यांच्या अध्यक्षतेखाली १६ खासदारांच्या समितीने ओबीसी समाजाची जनगणना करण्यात यावी असा अहवाल दिला होता. मात्र याची अंमलबजावणी केली नसून त्या सर्व अहवालास केराची टोपली दाखवली आहे. भाजपची मंडळी अतिशय बुद्धिमान व हुशार असून ती दिलेल्या शब्दाला प्रमाण मानणारी आहे. मग ओबीसी आरक्षणाचा शब्द गेला कुठे ? असा परखड सवालही त्यांनी भाजपच्या मंडळींना विचारीत २०२४ च्या निवडणुकीत जनता तुम्हाला कचरा पेटीत टाकल्याशिवाय राहणार नाही असा खणखणीत इशारा त्यांनी दिला. तसेच भाजपने ओबीसी घटकांतील बारा बलुतेदाराप्रमाणेच सर्वात जास्त माती मराठा समाजाची केली असल्याचे सांगून ते म्हणाले की, त्यांना नोकरी, धंदा नाही मग त्यांनी करायचे काय ? आता शिक्षण, राजकारणामधील आरक्षण संपले असून या समाजाला आरक्षण न मिळणे म्हणजे कोरोना आपत्ती सारखेच त्यांच्यावर संकट ओढावले आहे. हे आरक्षण मिळावे यासाठी जनजागृती मोठ्या प्रमाणात व्हावी यासाठी गावागावातून विचार तेवत ठेवण्याबरोबरच महासभा घ्याव्यात. त्या माध्यमातून आंधळ्या सरकारचे डोळे उघडावे लागतील. त्यासाठी कामच करावे लागेल नाहीतर भविष्य अंधकारमय आहे. मराठा, ओबीसी समाजाच्या आरक्षणाची माती करीत असाल तर तुमचीही माती होईल, असे त्यांनी यावेळी भाजपच्या मंडळींना ठणकावून सांगितले. सर्वात महत्वाचे म्हणजे डोळे दान करा. परंतू तुमचे स्वप्न व महत्वकांक्षा दान करु नका, असे आवाहनही त्यांनी केले. तर प्रा. सुशीलाताई मोराळे म्हणाल्या की, १९३१ साली इंग्रजांनी ओबीसींची जनगणना केली नसती व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानामध्ये ३४० कलम घातले नसते तर ओबीसींना अजिबातच आरक्षण मिळाले नसते. त्यामुळे डॉ. आंबेडकर यांचे डोंगराएवढे ओबीसी समाजावर उपकार आहेत. तसेच ७ ऑगस्ट १९९० ला तत्कालीन प्रधानमंत्री व्ही.पी. सिंग यांनी मंडल आयोग लागू केल्यामुळे प्रचंड मोठी क्रांती झाली आहे. ओबीसी समाजाची बाजू घेणाऱ्या नेतेमंडळींना भाजपच्या मंडळींनी तुरुंगात डांबण्यातचे काम केले आहे. ओबीसींना खरा न्याय देण्याचे शेवटचे काम शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी केले असल्याचे त्यांनी ठणकावून सांगितले. मात्र लालकृष्ण अडवाणी यांनी रथयात्रा काढून मंडल आयोगाला विरोध केला असल्याचा आरोपही त्यांनी केला. प्रधानमंत्री मोदी हे ओबीसी असून त्यांनी ओबीसींचे आरक्षण संपविले असून येत्या १५ ऑगस्टला गावागावात ओबीसी आरक्षण संदर्भात मिळावे घेवून ग्रामसभा, नगर परिषद, पंचायत समिती व जिल्हा परिषदेत ठराव पारित करून सरकारवर दबाव तंत्राचा वापर करावा, असेही त्यांनी सांगितले. यावेळी बोलताना डॉ. नवनाथ दुधाळ म्हणाले की, ओबीसी समाजाचे गेलेले आरक्षण परत मिळावे यासाठी लोणावळा येथे चिंतन बैठक घेण्यात आली.
त्यानंतर उस्मानाबाद येथे मेळावा व आज जागर मेळावा घेण्यात आला आहे. त्यामुळे यापुढे असेच मेळावे संपूर्ण राज्यभरात घेऊन मुंबईत मोठा मेळावा घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी बोलताना सोमनाथ काशीद म्हणाले की, आरक्षण हा किमान त्या जातीतील प्रतिनिधीचा मार्ग असून तो दारिद्र्य निर्मूलनाचा कार्यक्रम नाही. तर लक्ष्मण माने म्हणाले की, जातनिहाय जनगणना डावलण्याचा प्रयत्न मोदींनी केला असल्यामुळे आम्ही राजकीय आरक्षण समिती स्थापन केली आहे. या समितीच्या माध्यमातून संपूर्ण ओबीसी समाजाला जागृत करण्याची मोहीम राबवित आहोत. यावेळी बोलताना खलील सय्यद म्हणाले की, मोदींना देशात पुन्हा मनुस्मृती आणायचे काम सुरू केले असून आम्ही या विरोधात ओबीसी समाजाच्या खांद्याला खांदा लावून लढण्यास तयार आहोत. भाजपने कितीही नाटक केले तरी २०२४ ला ओबीसींचे आरक्षण शंभर टक्के राहणार असा दावाही त्यांनी यावेळी केला. तर सुखदेव भालेकर म्हणाले की, आपल्यातील फुटीरवादी व राजकीय मंडळींनी पोसलेल्या दलालापासून ओबीसींना मोठा धोका असू त्यासाठी एकी महत्त्वाची असल्याचे त्यांनी सांगितले. तर बाळासाहेब सानप म्हणाले की, वाड्या-वस्त्यांवर ओबीसींचे संघटन केल्याशिवाय आपल्याला आरक्षण मिळणार नाही. केंद्राने ओबीसींची जनगणना न करण्याचा ठराव घेतला आहे. मात्र राज्यातील भाजप ओबीसींना आरक्षण मिळावे, अशी भूमिका मांडत आहे. त्यामुळे राज्यातील व केंद्रातील भाजप वेगळी आहे का ? असा सवालही त्यांनी केला. यावेळी बोलताना नवनाथ पडळकर म्हणाले की, ओबीसी आरक्षणासाठी प्रधानमंत्री व्ही.पी. सिंग यांनी खुर्चीला लाथ मारली व ओबीसींना आरक्षण मिळवून दिले. मात्र मोदी सरकारने ओबीसींच्या राजकीय पाठशाळेला कुलूप ठोकण्याचे काम नियोजनबद्ध पद्धतीने न्यायालयाच्या माध्यमातून केले असल्याचा थेट आरोपही त्यांनी केला. ओबीसींच्या आरक्षणासाठी विजय वडेट्टीवार यांनी राजीनामा देण्याची तयारी दाखविली असल्याचे त्यांनी नमूद केले.
यावेळी शरद कोळी, राजेंद्र राख, बालाजी शिंदे रामराव वडकुते, दादासाहेब मुंडे आदींनी आपले विचार व्यक्त केले. प्रारंभी महात्मा बसवेश्वर, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, राजर्षी शाहू महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करून दीपप्रज्वलन करण्यात आले. उपस्थित मान्यवरांचा फेटा, शाल व पुष्पहाराने स्वागत करण्यात आले. प्रास्ताविक स्वागताध्यक्ष शिवानंद कथले यांनी तर सूत्रसंचालन पांडुरंग लाटे यांनी व उपस्थितांचे आभार डॉ. नवनाथ पडळकर यांनी मानले. या जागर मेळाव्यास जिल्ह्यासह पश्चिम महाराष्ट्र व मराठवाड्यातील ओबीसी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
छाया /राहुल कोरे आळणीकर