सोयाबीनचे पंचनामे करण्यासह तुळजाभवानी मंदिर सुरु करण्याची काँग्रेसची मागणी

0


सोयाबीनचे पंचनामे करण्यासह तुळजाभवानी मंदिर सुरु करण्याची काँग्रेसची मागणी



उस्मानाबाद दि.१७ (प्रतिनिधी) - पावसाअभावी जिल्ह्यातील सोयाबीन सुकून गेलेले आहे. त्यामुळे त्या सर्व पिकांचे पंचनामे करण्यात यावेत. तसेच तुळजापूर येथील श्री तुळजाभवानीचे मंदिर सुरु करण्यात यावे, अशी मागणी काँग्रेस पक्षाच्यावतीने माजी मंत्री व ज्येष्ठ नेते मधुकरराव चव्हाण यांनी शिष्टमंडळासह एका निवेदनाद्वारे जिल्हाधिकार्‍यांकडे दि.१७ ऑगस्ट रोजी करण्यात आली आहे.



दिलेल्या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की जिल्ह्यांमध्ये दि.२२ जुलैपासून पावसाने दडी मारली असून २५ दिवसापासून पाऊस गायब झाला आहे. त्यामुळे सोयाबीनसह इतर पिके सुकून करपून गेलेली आहेत यानंतर पाऊस पडला तरी ती पिके शेतकऱ्यांच्या हाती लागणार नाहीत. कोरोना संकटासह नैसर्गिक संकटामुळे शेतकरी हैराण झाला असून पाणी असून देखील महावितरणच्या भोंगळ कारभारामुळे संरक्षित पाणी देता आले नाही. सोयाबीन हे नगदी पीक असून शेतकऱ्यांनी कर्ज काढून या पिकांची विक्रमी पेरणी केलेले होती. मात्र पाऊस न पडल्यामुळे शेतकऱ्यांच्या हातचे सोयाबीन गेले आहे. त्यामुळे या पिकांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी.






 तसेच कोरोनामुळे मागील दीड वर्षापासून तुळजाभवानी मंदिर बंद आहे. तर तुळजापूर तीर्थक्षेत्राची संपूर्ण अर्थव्यवस्था ही श्री तुळजाभवानी मंदिरावर अवलंबून आहे. कोरोना संसर्गामुळे बंद झालेले २५ जिल्हे खुले होऊन सर्व व्यवहार सुरळीतपणे सुरू झालेले आहेत. मात्र तुळजाभवानी मंदिर बंद झाल्याने येथील पुजारी छोटे-मोठे व्यवसायिक, लॉज व हॉटेल चालक यांची उपासमार सुरू आहे. त्यामुळे येथील नागरिकांची होणारी घुसमट प्रचंड मोठ्या प्रमाणावर आहे. तर पुजारी व संपूर्ण बाजारपेठ मोठ्या आर्थिक अडचणीत सापडलेली असून यासंदर्भात वेळोवेळी सर्व घटकांकडून मंदिर सुरू करण्याची मागणी करण्यात आलेली आहे. येथील गंभीर परिस्थितीची राज्य सरकारला जाणीव करून देऊन तात्काळ प्रस्ताव पाठवून मंदिर खुले करण्याची प्रक्रिया करण्यात यावी. 





तसेच तुळजापूर शहरातील नागरिकांची उपजीविका श्री तुळजाभवानी मंदिरावर अवलंबून असल्याने त्यांना मंदिर संस्थानाच्या माध्यमातून दरमहा १० हजार रुपयाची मदत करावी अशी मागणी देखील करण्यात आली आहे. यावेळी जिल्हाध्यक्ष धीरज पाटील, जिल्हा संघटक राजाभाऊ शेरखाने, अल्पसंख्यांक विभागाचे जिल्हाध्यक्ष खलील सय्यद, उपाध्यक्ष प्रशांत पाटील, दर्शन कोळगे, नगरसेवक सिद्धार्थ बनसोडे, ओबीसी विभागाचे अध्यक्ष धनंजय राऊत, उपाध्यक्ष सलमान शेख आदी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top