विदेशी मद्य विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश
राज्य उत्पादन शुल्क विभागाची कामगिरी
उस्मानाबाद दि.११ (प्रतिनिधी) - जिल्ह्यातील विविध भागात अवैधरित्या विदेशी मद्य विक्री करण्यासाठी येत असलेल्या परजिल्ह्यातील टोळीचा राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे सापळा रचून पर्दाफाश केला आहे.
तर या पथकाने त्यांच्या ताब्यातून विदेशी दारुच्या बॉक्ससह एका आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. तर दारू विक्री करण्यासाठी वापरण्यात येणारे एक चार चाकी वाहन असा एकूण ८ लाख ७० हजार ७६० रुपयांचा मालमत्ता जप्त केला आहे. ही धडाकेबाज कारवाई दि. ११ ऑगस्ट रोजी केली आहे.
याबाबत राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे उस्मानाबाद येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक आर.एस. कोतवाल यांनी पथकास सोबत घेऊन तुळजापूर-उस्मानाबाद या राष्ट्रीय महामार्गावरील तेरणा कॉलेज जवळ सापळा रचून अवैधरित्या विक्रीसाठी येत असलेल्या वाहनासह वाहनातील दारू व एका आरोपीस जेरबंद केले. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे राज्याचे आयुक्त कांतीलाल उमाप, संचालक उषा वर्मा, औरंगाबाद विभागाचे विभागीय आयुक्त पी.एच. पवार व उस्मानाबाद येथील अधीक्षक विजय चिंचाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक आर.एस. कोतवाल यांनी दि. ११ ऑगस्ट रोजी मिळालेल्या गुप्त बातमीनुसार उस्मानाबाद येथील आयुर्वेदिक कॉलेज समोरील रोडवर सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील नारीवाडी येथील बळीराम मनोहर शिंदे वय ३३ वर्ष व मनोहर कोरेकर वाहन मालक व इतर फरार यांच्या ताब्यातून गुन्ह्याचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे
पांढऱ्या रंगाची फोर्स कंपनीची ट्रॅक्स कार्गो किंग स्टार चार चाकी वाहन (क्र. एम.एच - १३ सी.यू. - ४९६२) या वाहनामध्ये १८० मिली क्षमतेच्या विदेशी मद्य इम्पेरियल ब्ल्यू व्हिस्की ब्रांडच्या ३ हजार ७२ बॉटल असलेले ४० बॉक्स १८० मिली क्षमतेच्या विदेशी मद्य मेकडॉल नंबर वन विस्की ब्रँडच्या एकूण ३०७२ बॉटल ४० बॉक्स प्लास्टिक कॅरेट एकूण ५० असा एकूण ८ लाख ७० हजार ७६० विदेशी मद्याचे एकूण ८० बॉक्स मद्य साठा व एक चार चाकी वाहन मिळून आले. या प्रकरणी आरोपी बळीराम शिंदे व इतरांच्या विरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा १९४९ चे कलम ६५ अ, ड, इ ८१, ८३, ९० व १०८ नुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे. ही कारवाई निरीक्षक आर.एस कोतवाल, सहाय्यक दुय्यम निरीक्षक एस.आर. शिंदे, जवान एम.एस. गजधने, बी.बी. भंडारे, वाहनचालक ए.एम. सोनकांबळे यांच्या पथकाने केली असून पुढील तपास निरीक्षक आर.एस. कोतवाल हे करीत आहेत.