राष्ट्रीय सेवा योजना दिन साजरा
उस्मानाबाद :- कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, नळदुर्ग व तेरणा महाविद्यालय, उस्मानाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय सेवा योजना दिनानिमित्त व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते डॉ. डी. बी.मोरे (अर्थशास्त्र विभाग प्रमुख, तेरणा महाविद्यालय, उस्मानाबाद) हे होते. त्यांनी राष्ट्रीय सेवा योजना दिन, त्याची स्थापना , त्याचे महत्व विशद केले. राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी स्व-विकासातून राष्ट्र विकास साधला पाहिजे, असे सूचित केले. व्यक्तीच्या जीवनामध्ये राष्ट्रीय सेवा योजना किती महत्त्वाचे आहे हे त्यांनी आपल्या व्याख्यानातून पटवून दिले. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य, डॉ. संजय कोरेकर( कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, नळदुर्ग) हे होते. त्यांनी अध्यक्षीय समारोपात राष्ट्रीय सेवा योजनेची उद्दिष्टे, ध्येय-धोरणे स्पष्ट केली. मी ही राष्ट्रीय सेवा योजनेचा विद्यार्थी आहे, माझी जडणघडण राष्ट्रीय सेवा योजनेतून झाली आहे असे सांगितले . ज्यावेळेस नैसर्गिक आपत्ती येते, त्यावेळेस राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक उस्फूर्तपणे देशसेवा करण्यासाठी उत्साहाने पुढाकार नोंदवतात, हा इतिहास आहे. रासेयोच्या विद्यार्थ्यांच्या अंगी शिस्त भरलेली असते.देशसेवा करण्यासाठी ते विद्यार्थी तत्पर असतात, असे सूचित केले. प्रमुख उपस्थितीत तेरणा महाविद्यालयाचे प्राचार्य, डॉ. अशोक घोलकर हे होते. त्यांनी या व्याख्यान कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रासेयो कार्यक्रम अधिकारी डॉ. निलेश शेरे, कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. अनघा तोडकरी, पाहुण्यांचा परिचय डॉ. तुळशीराम उकिरडे तर आभार डॉ. रोहिणी महिंद्रकर यांनी मानले. या कार्यक्रमासाठी रासेयो कार्यक्रम अधिकारी डॉ. भारत हंडीबाग, प्रा. महेंद्र भालेराव यांचे सहकार्य लाभले. दोन्ही महाविद्यालयातील प्राध्यापक, प्राध्यापिका, राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक,शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.