शेतकऱ्यांनी शिवार हेल्पलाईनला संपर्क करा
शिवार मदत केंद्राचे आवाहन ८९५५७७१११५ शिवार हेल्पलाइन
उस्मानाबाद:
उस्मानाबाद जिल्ह्यात गेल्या आठवड्यापासून अतिवृष्टी होत आहे,त्यामुळे बळीराजा समोर संकटांची मालिकाच उभी राहिलेली आहे.खरिपाच्या सुरुवातीला सोयाबीनच्या बोगस बियाण्यामुळे शेतकरी अगोदरच नैराश्याच्या भावनेत होते, त्यातून कसेबसे सावरत आहे तोच आता हाता-तोंडाशी आलेल्या पीकालाही अतिवृष्टीचा फटका बसला आहे व पिकाचे प्रचंड नुकसान झाले आहे.
मागील चार वर्षापासून बळीराजाला मानसिक पाठबळ देण्यासाठी अविरतपणे शिवार हेल्पलाइनच्या माध्यमातून जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली शिवार फाऊंडेशन ही संस्था काम करत आहे, तरी शिवार हेल्पलाइन कडून आवाहन करण्यात येत आहे की, शेतकऱ्याला जर कोणत्याही प्रकारचा ताण जाणवल्यास नुकसान झालेले असल्यास,कोणत्याही भावना व्यक्त करायच्या असतील तर कृपया आमच्याशी संपर्क साधा. आपण सर्वजण मिळून नक्की मार्ग काढू; पण कोणताही चुकीचा विचार करू नका. मनात कोणताही चुकीचा विचार आला तर त्वरित शिवार हेल्पलाईनवर 8955771115 संपर्क करा. हेल्पलाइन सकाळी १० ते रात्री ६ पर्यंत मोफत आहे. काही तांत्रिक अडचणी येत असल्यास पिक विमा कंपनीशी समन्वय साधून योग्य मार्गदर्शन व सल्ला ही देण्यात येईल.
यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय येथे शेतकरी मदत केंद्राद्वारे मानसिक आरोग्याबाबत मार्गदर्शनासाठी मारिवाला हेल्थ इनिशिएटिव्ह ,जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद, जिल्हा पोलीस दल, कृषी विभाग, तपस्वी पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट उस्मानाबाद, कृषी महाविद्यालय गडपाटी उस्मानाबाद व राष्ट्रीय सेवा योजना या शासकीय, अशासकीय, स्वयंसेवी अशा सर्वच संस्थाचे सहकार्य मिळत आहे.
नोट
शेतकऱ्यांनी नुकसानग्रस्त पिकाचा विमा भरलेला आहे अशा पिकाच्या नुकसानीची माहिती ७२ तासांच्या आत ऑनलाइन दाखल करावी. किंवा १८००२०९५९५९ या टोल फ्री नंबर वर आपली तक्रार नोंदवावी,असे आव्हान जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी एम. डी. तिर्थकर यांनी केले आहे.