खाद्यतेलाचा पुनर्वापर केल्यास होणार दंडात्मक कारवाई; सहाय्यक आयुक्त प्रदीप राऊत यांनी दिला इशारा
सोलापूर- जिल्हा व शहरातील सर्व अन्न व्यावसायिकांनी खाद्य पदार्थ तळण्यासाठी तेलाचा जास्तीत जास्त दोन वेळा वापर करुन संपवावे, जर ते आपण पुन्हा तळण्यासाठी वापरले तर त्यातील पोलर कंपाऊंडचे व ट्रान्सफॅटचे प्रमाण वाढून ते आरोग्यावर विपरीत परिणाम करते. अन्न पदार्थ तळण्यासाठी तेलाचा पुनर्वापर केल्यामुळे हदयविकार, कर्करोगासह पचनक्रियेसंबंधी विकारांचा धोका वाढत आहे.
*खाद्य तेलाचा वापर कसा करावा-
खाद्य तेलाचा तळण्यासाठी वापर करताना गॅस हा कमी आगीवर ठेवावा. जेणेकरुन तेलामधुन धुर येणार नाही याची काळजी घ्यावी. तसेच तळण्यासाठी शक्यतो स्टेनलेस स्टिलच्या भांड्यांचा वापर करावा. लोखंडी कढईचा वापर टाळावा. तळताना तेलात जमा झालेले अन्नकण हे वारंवार तळुन काळे होण्यापुर्वीच लगेचच बाहेर काढावेत.
*साठवणूक केलेल्या खाद्य तेलाची तपासणी केली जाणार-
दररोज 50 लिटरपेक्षा अधिक तेलाचा वापर करीत असलेल्या व्यावसायिकांनी साठयाबाबत नोंद ठेवणे बंधनकारक आहे. असे साठविलेले खाद्यतेल केंद्रीय अन्न सुरक्षा व मानदे प्राधिकरण, नवी दिल्ली यांची मान्यता असलेल्या बायोडिझेल उत्पादक कंपनी आणि त्यांचे स्थानिक प्रतिनीधी चॅनल पार्टनर यांना देणे बंधनकारक आहे.
*अन्यथा दंडात्मक कारवाईचा इशारा-
सदरचे वापरण्यायोग्य नसलेले खाद्यतेल बायोडिझेल उत्पादक कंपनीला दिल्याबद्दल सदर कंपनी मार्फत अन्न उत्पादक व्यावसायिकांना शासन नियमाप्रमाणे मोबदला देण्यात येणार आहे. सोलापूर जिल्ह्यासाठी यु.एन.आय सर्व्हिसेस यांची स्थानिक प्रतिनिधी म्हणुन नेमणुक केलेली आहे. त्यांचा दुरध्वनी क्र. 0231-2627007 असा आहे. तसेच वापरुन किती तेल शिल्लक राहिले, तेलाची विल्हेवाट कशी लावली किंवा शिल्लक तेल हे कोणत्या नोंदणीकृत बायोडिझेल उत्पादकाला दिले. यासंबधी पुर्ण नोंदी ठेवणे आवश्यक आहे. त्यामुळे तेलाचा पुनर्वापर करणाऱ्या व्यावसायिकांवर अन्न सुरक्षा व मानदे कायद्याअंतर्गत कठोर दंडात्मक कारवाई करण्याचा इशारा अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त (अन्न) प्रदिपकुमार राऊत यांनी दिला आहे.