उस्मानाबाद, दि. 20 - अतिवृष्टीमुळे खरीप हंगामात झालेल्या पिकांची नुकसान भरपाई देण्यात विमा कंपनीने हात आखडते घेतले आहेत. जिल्ह्यातील नेतेमंडळी श्रेयवादात गुरफटून गेल्याने शेतकरी आपल्या हक्काच्या पीकविम्यापासून वंचित राहात आहे. त्यामुळे प्रशासन स्तरावरून पाठपुरावा करून नुकसानग्रस्तांना विमा कंपनीकडून भरपाई व शासनाकडून अनुदान मिळवून देण्यात यावे, अशी मागणी काँग्रेसच्यावतीने जिल्हाधिकार्यांकडे करण्यात आली आहे.
उस्मानाबाद तालुक्यातील तेर, पाडोळी, रामवाडी व येडशी परिसरात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकर्यांचे मोठे नुकसान झाले आहे. पावसाचे पाणी बहुतांश नागरिकांच्या घरात घुसल्याने संसारोपयोगी साहित्य व धान्याची नासाडी होवून मोठी आर्थिक हानी झाली. तसेच पिके पाण्याखाली असल्याने नासाडी झाली. तर शेतातील सुपिक माती वाहून गेल्याने शेतीचे कधीही भरून न येणारे नुकसान झाले आहे. शेतकर्यांनी खरीप हंगामात आपली पिके विमा संरक्षित केली होती.
मात्र नुकसानीच्या तुलनेत बहुतांश शेतकर्यांना योग्य ती भरपाई मिळाली नाही तर अनेक शेतकरी पीकविम्यापासून वंचित ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे कृषी अधिकारी आणि विमा कंपन्यांकडे शेतकरी हेलपाटे मारू लागले आहेत. शेतकर्यांवर होत असलेला अन्याय थांबवून त्यांना नियमानुसान योग्य तीन नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.
यावेळी तालुकाध्यक्ष रोहित पडवळ, जिल्हा कार्याध्यक्ष सय्यद खलील, जिल्हा उपाध्यक्ष लक्ष्मण सरडे, सुभाष हिंगमिरे, अशोक शिंदे ,कानिफनाथ देवकुळे सेवा दलाचे अध्यक्ष तानाजी जाधव पस सदस्य अश्रूबा माळी,नंदकुमार क्षीरसागर,रामवाडी माजी सरपंच पांडुरंग वाकुरे दत्ता हजारेव आदींची उपस्थिती होती.