उस्मानाबाद,दि.4(जिमाका): उस्मानाबाद हा आकांक्षित जिल्हा असल्याने 2021-22 मध्ये कृषी यांत्रिकीकरण उपअभियानतंर्गत कृषी कल्याण अभियान -तीन जिल्हयात राबविण्यात येणार आहे.यात कृषी यांत्रिकीकरणास प्रोत्साहन देण्यासाठी भाडेतत्तावर कृषी यांत्रिकीकरण सेवा सुविधेसाठी कृषी औजारे बँक स्थापना करण्यात येणार आहे.या कृषी औजारे बँकेसाठी 80 टक्के किंवा जास्तीत जास्त रक्कम आठ लाख रुपये अनुदानावर राबविण्याकरीता जिल्हयास प्रती तालुका दोन औजारे बँक या प्रमाणे लक्षांक प्राप्त झाले आहे, यासाठी पात्र संस्थानी 12 फेब्रुवारी 2022 पर्यंत अर्ज करावेत,असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी केले आहे.
जिल्हयातील इच्छुक आणि पात्र सर्व शेतकरी सहकारी संस्था, शेतकरी उत्पादक कंपणी , शेतक-यांचे नोंदणीकृत गट, नोंदणीकृत शेतकरी बचत गट यांच्याकडून विहीत नमुन्यात सर्व कागदपत्रांसह अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र संस्थानी संबधित तालुका कृषी अधिकारी यांच्या कार्यालयात विहीत नमुन्यातील अर्ज भरुन सादर करावेत.
अर्जासोबत लागणारे आवश्यक कागदपत्र
विहीत नमुन्यातील अर्ज,शेतकरी उत्पादक कंपणी / गट नोंदणी प्रमाणपत्र, खरेदी करावयाच्या यंत्र / औजारांचे अधिकृत विक्रेत्याचे दरपत्रक ( कोटेशन ),खरेदी करावयाच्या यंत्र / औजारांचे केंद्र शासनाच्या मान्यता प्राप्त तपासणी संस्थेचा तपासणी अहवाल, आधार कार्ड / फोटो असलेल्या ओळखपत्राची स्वयंसाक्षांकित प्रत., संस्थेशी संबधित व्यक्तिच्या बँक खात्यात अनुदान जमा करण्यास संस्थेने प्राधिकृत केले असल्यास प्राधिकृत केल्याचे पत्र आणि संबधित व्यक्तिचे आधारकार्ड/ फोटो असलेल्या ओळखपत्राची स्वयंसाक्षांकित प्रत.
या योजनेत मर्यादीत स्वरुपात लक्षांक असल्याने लक्षांकापेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाल्यास पात्र अर्जांमधून सोडत पद्धतीने संबधित उप विभागीय कृषी अधिकारी लाभार्थी निवड करतील.
संबधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयाकडे 12 फेब्रुवारी 2022 पर्यंत संपूर्ण कागदपत्रासह अर्ज सादर करावेत. या तारखरेनंतर आलेल्या अर्जांचा विचार केला जाणार नाही. योजनेच्या अधिक माहितीसाठी संबधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असेही अवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी यांनी केले आहे.