उस्मानाबाद-
अब की बार - किसान सरकार हा नारा घेऊन भारत राष्ट्र समिती (बीआरएस) पक्ष महाराष्ट्रात लोकसभा, विधानसभा व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढणार असून महाराष्ट्रातील व देशातील शेतकरी, दीन-दलितांचे जीवनमान उंचावण्यासाठी तेलंगणा पॅटर्न राबविणार असल्याची माहिती भारत राष्ट्र समितीचे मराठवाडा विभाग समन्वयक सोमनाथ थोरात यांनी दिली.
उस्मानाबाद येथे भारत राष्ट्र समितीच्या जिल्हा कार्यकारिणीची बैठक मंगळवारी (दि.6) शासकीय विश्रामगृहात घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते. बैठकीस मराठवाड समन्वयक सोमनाथ थोरात, एस.एस. रितापुरे, फुलचंद गायकवाड, प्रशांत नवगीरे, मुजीब मकानदार, संजय भिसे, अरुण माने, रामचंद्र भराटे, बाबुराव शिंदे, रामजिवन बोंदर व इतर मान्यवर पदाधिकार्यांची उपस्थित होती. यावेळी वृंदांवनी गवळी, आर.के. माने, सुधा झेंडे,अझहर शेख, काशिनाथ शिंदे यांनी बीआरएस पार्टीत जाहिर प्रवेश केला
श्री.थोरात म्हणाले की, भारत राष्ट्र समितीचे अध्यक्ष तथा तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या नेतृत्वाखाली तेलंगणा राज्यात सक्षमपणे राज्य चालविले जात आहे. त्याच धर्तीवर महाराष्ट्र आणि संपूर्ण देशभरातील इतर राज्ये आणि केंद्रात भारत राष्ट्र समितीचे सरकार स्थापन करण्यासाठी मोठ्या प्रमाणात जनचळवळ हाती घेण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात भारत राष्ट्र समिती महाराष्ट्रासह इतर राज्यांमधील संपूर्ण लोकसभा, विधानसभा निवडणुका तसेच स्थानिक स्वराज्य संस्था अर्थात् जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर परिषद, नगर पंचायत निवडणुका स्वबळावर लढणार आहे. त्यासाठी गावोगावी सभा, बैठका घेऊन कार्यकर्त्यांचे संघटन मजबूत करण्यात येणार आहे. त्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्याने गावागावात सभासद नोंदणी करून संघटन मजबूत करावे असे आवाहनही यावेळी श्री.थोरात यांनी केले.
तेलंगणा राज्यात शेतकर्यांच्या सक्षमीकरणासाठी विविध योजना राबविल्या जात आहेत. शेतकर्यांना मोफत वीज आणि पाणी दिले जाते. शेतकर्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्यास त्याच्या दशक्रियाविधीपूर्वी त्यांच्या वारसाच्या खात्यात विमा रक्कम जमा केली जाते. शेती अवजारासांसाठी 95 टक्के अनुदान उपलब्ध करून दिले जाते. त्यामुळे सन 2018 पासून तेलंगणा राज्यातील शेतकरी आत्महत्या रोखण्यात भारत राष्ट्र समिती (बीआरएस) सरकारला यश आले आहे. त्याचबरोबर दलित कुटुंबाला व्यवसायासाठी 10 लाखापर्यंत अनुदान उपलब्ध करून त्यांच्या सक्षमीकरणाचे कार्य सुरू आहे. आसरा पेन्शन योजनेअंतर्गत विधवा, परित्यक्ता महिलांसाठी 2 हजार आणि दिव्यांगांना 3 हजार रूपये पेन्शन मंजूर करण्यात येते. बेघरांना 2 बीएचके घर, प्रसुती झालेल्या महिलेसाठी kcr किट मोफत देण्यात येते. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना केजी टू पीजी पर्यंत शैक्षणिक शुल्काची परिपूर्ती तेलंगणा सरकार करत आहे. शेतकर्यांचा पीकविमा संपूर्णतः सरकारच भरणा करीत आहे.त्याचबरोबर शेतकरी विम्याच्या माध्यमातून पाच लाख व मुलीच्या लग्नासाठी एक लाखाची मदत दिली जाते अशा लोकहिताच्या सुमारे 450 योजना तेलंगणा सरकार राबवित आहे. मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या नेतृत्वाखालील तेलंगणा सरकारचा हा फॉर्म्युला संपूर्ण महाराष्ट्र आणि देशभरात राबविण्यासाठी आपले संघटन अधिक मजबूत करून महाराष्ट्रात सरकार आल्यावर काल कालश्वरम सारखी शेतकऱ्यांसाठी प्रोजेक्ट तयार करून मराठवाडा ओलिताखाली आणू असेही ते यावेळी म्हणाले भारत राष्ट्र समिती हा पक्ष लोकचळवळ बनवावी, असे आवाहन श्री. थोरात यांनी यावेळी केले.