google.com, pub-1406548548385211, DIRECT, f08c47fec0942fa0 ग्राहकांनी आपल्या अधिकाराविषयी जागरूक असावे: रूपाली आवले

ग्राहकांनी आपल्या अधिकाराविषयी जागरूक असावे: रूपाली आवले

0


Osmanabad news :- 

                    उस्मानाबाद.दि.15 ) - ग्राहकांनी आपल्या अधिकाराबाबत जागरूक असावे तसेच वस्तू निवडण्याचा, त्यांचा दर्जा व प्रमाण जाणून घेण्याचा आणि खात्री करण्याचा अधिकार ग्राहकांना आहे. याबाबत नियमबाह्य कृती होत असल्याचे दिसून आल्यास जिल्हा प्रशासनाकडे तक्रार करा.असे आवाहन अप्पर जिल्हाधिकारी रुपाली आवले यांनी आज केले. येथील तहसील कार्यलयातील महसूल भवन येथे आयोजित जागतिक ग्राहक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाप्रसंगी त्या बोलत होत्या.यावेळी जिल्हा पुरवठा अधिकारी स्वाती शेंडे, जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायालयाचे न्यायाधीश सस्ते,तहसीलदार गणेश माळी, तहसीलदार मनिषा मेने, नायब तहसीदार सचिन काळे,अग्रणी बँकेचे विजयकर एसबीआय बँकेचे मुकेश कुमार,अनिल पाटील,आणि संपतराव झळके, अजित बागडे उस्मानाबाद जिल्ह्यातील स्वस्त धान्य दुकान चालक-मालक आदी उपस्थित होते.

 सध्या डिजिटल क्रांतीचे वारे वेगाने वाहते आहे.आपण मागच्या दोन वर्षात कोरोना काळात याचा अनुभव जवळून घेतलेला आहे.ग्राहकांनी आपल्या अधिकाराबाबत आणि कर्तव्या विषयी जागरूक असावे जेणेकरून आपली कोणी फसवणूक करणार नाही. ग्राहकांची फसवणूक करण्याचे नवनवे फंडे येत आहेत. वेगवेगळ्या योजना सांगून ग्राहकांची आर्थिक कोंडी ही अलीकडच्या काळात होत आहे. यासाठी ग्राहकांनी दक्ष राहून आपली फसवणूक होणार नाही याची काळजी घ्यावी, असेही यावेळी श्रीमती आवले म्हणाल्या. 

यावेळी स्वाती शेंडे यांनी प्रास्ताविक केले.त्या म्हणाल्या , ग्राहक म्हणजे बाजारपेठेचा राजा. आजच्या जागतिकीकरण स्पर्धात्मक युगात हा ग्राहक राजा अतिशय महत्वाचा भाग झाला आहे. ग्राहक हा बाजारपेठेतील आर्थिक उलाढाल आणि खरेदी विक्रीचा केंद्रबिंदू आहे. पण अनेकदा एक वस्तू खरेदी करा आणि दुसरी मोफत मिळवा, अमुक खरेदीवर सोने चांदीचे नाणे मोफत मिळेल, चेहरा ओळखा आणि लाखांची बक्षिसे जिंका, भाग्यवान विजेत्यांना कार मिळेल अशा जाहिराती दाखवून ग्राहकांची फसवणूक केली जाते. त्यामुळे ग्राहकांनो, वस्तू खरेदी करताना कुठल्याही आमिषाला बळी न पडता ही तीच असल्याचे पारखून पाहा.सेवा पुरविण्याबाबत होणाऱ्या हलगर्जीपणामुळे १९६० च्या दशकात अमेरिकेत अध्यक्षीय निवडणुकीमध्ये ग्राहक चळवळीचा मुद्दा ऐरणीवर आला होता. अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष जॉन. एफ. केनेडी यांनी ग्राहकांच्या प्रश्नांविषयी एक व्यासपीठ तयार केले आणि त्याबाबत जागतिक स्तरावर पाठपुरावा केल्यानंतर युनेस्कोने त्याला मान्यता दिली. त्यानुसार दरवर्षी १५ मार्च रोजी जागतिक ग्राहक दिन साजरा केला जातो. यावर्षी १०० देशांमधील २२ ग्राहक गटांनी जागतिक थीम म्हणून 'फेअर डिजिटल फायनान्स' ही थीम निवडली आहे. कंझ्युमर्स इंटरनॅशनलचे हे सर्व सदस्य आहेत. या थीमनुसार २०२४ पर्यंत, डिजिटल बँकिंगचे ग्राहक ३.६ अब्ज पेक्षा जास्त होण्याची अपेक्षा आहे. असेही श्रीमती शेंडे यावेळी म्हणाल्या.

     जिल्हा ग्राहक निवारण आयोगाचे प्रमुख सस्ते म्हणाले की, ग्राहकांनी फसवणूक झाल्याक्षणी त्याबाबत पोलीस स्टेशनमध्ये प्रथम तक्रार करणे आवश्यक असल्याचे म्हटले.  जागो ग्राहक जागो.. असं सांगण्यासाठी मागचं कारणच हे आहे की,ग्राहक आयोगाच्या माध्यमातून अत्यंत कमी वेळात फसवणूक झालेल्या व्यक्तींना ग्राहक आयोगाकडून निकाल दिला जातो मात्र ग्राहकांमध्ये न्यायाप्रति असलेली उदासीनता दिसून येते. आयोगाकडे अनेक तक्रारी येतात मात्र त्यामध्ये  तक्रारदाराला आपले म्हणणे व्यवस्थितरित्या मांडता येत नाही किंवा अपु-या माहितीच्या आधारे तक्राररावर खटला चालवणे शक्य होत नाही अशा अनेक कारणामुळे ग्राहकांना न्याय मिळत नाही. ग्राहकांनी दक्ष राहून न्याय मिळवावा,न्यायालय,प्रशासन आणि पोलीस आपल्यासाठी कार्यरत आहे. आम्ही कायद्याचे रक्षाक आहोत आपणही कायद्याचे ज्ञान आत्मसात करावे,असे आवाहनही श्री.सस्ते यांनी यावेळी केले

 यावेळी ग्राहक आयोगाचे अजित बागडे अग्रणी बँकेचे विजयकर आणि एसबीआय बँकेचे मुकेश कुमार यांनीही जागतिक ग्राहक दिनानिमित्त मार्गदर्शन केले. उस्मानाबाद तहसील कार्यालयातील पुरवठा विभागाचे नायब तहसीलदार राजाराम केलूरकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.महसूल भवनामध्ये झालेल्या या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वृषाली तेलोरे यांनी केले. तर आभार तहसिलदार गणेश माळी यांनी मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top