Osmanabad news :-
लोककलांच्या माध्यमातून मनोरंजन करत राज्य शासनाच्या योजना पोहचताहेत गावोगावी
उस्मानाबाद,दि.14 ):- राज्यातील महाविकास आघाडी शासनास दोन वर्षे पूर्ण झाल्याबद्दल माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातर्फे राज्यभर एकाच कालावधीत लोककलांच्या माध्यमातून राज्य शासनाच्या योजना लोककला पथकांच्या कार्यक्रमाद्वारे नागरिकांचे मनोरंजन करत गावोगावी पोहचवल्या जात आहेत. जिल्हाभरात या कार्यक्रमांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यात आदर्श लोकजागृती कलामंडळ, महिषासुर मर्दिनी सांस्कृतिक लोककला मंच तथा कला पथक, ईश्वर प्रभू कलामंच यांचे कार्यक्रम सुरु आहेत. जिल्ह्यातील आठही तालुक्यात योजनांची माहिती देण्याचा जागर सध्या सुरु आहे. शाहिरी, पोवाडा, लोकगीतांच्या माध्यमातूनही योजनांची जनजागृती सुरु आहे. कलापथकांच्या या कार्यक्रमांना गावागावांतून चांगला प्रतिसाद मिळत आहे. महिषासुर मर्दिनी सांस्कृतिक लोककला मंचाने लोहारा तालुक्यातील सास्तूर, माकणी, करजगाव, होळी येथे कलापथकाचे कार्यक्रम करुन योजनांची माहिती दिली, तर ईश्वर-प्रभू कलापथकाने भूम तालुक्यातील दहिफळ, पाथरुड, बावी, आंबी, ईट, भूम शहर, वालवड, आष्टा परंडा तालुक्यातील जेवळी येथे कलापथकाचे कार्यक्रम करुन योजनांची माहिती दिली. आदर्श लोकजागृती कलामंडळाने तुळजापूर तालुक्यातील जळकोट, ईटकळ, काटी आदी गावांमध्ये मनोरंजनातून शासकीय योजनांची माहिती दिली.
गावोगावचे सरपंच, ग्रामसेवक आणि लोक प्रतिनिधी या लोककला पथकांच्या कार्यक्रमास उपस्थिती लावून कार्यक्रमांचा आस्वाद घेत योजनांची माहिती जाणून घेत आहेत. अनेक गावात सरपंच, प्रशासकीय अधिकारी आणि स्थानिक लोक प्रतिनिधींच्या हस्ते या कलापथकांच्या कार्यक्रमाची सुरुवात होत आहे. नागरिक कलावंताची भेट घेऊन स्वत: होऊन प्रतिक्रीया देत आहेत.