उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये वाढणार तापमानाचा पारा
बातमी लेखन :- प्रकाश साखरे
मागील काही दिवसापासून जिल्ह्यामध्ये तापमानाचा पारा ४० अंश सेल्सियसच्या पुढे गेला असून पुढील काही दिवसात तापमान हे ४२ – ४३ अंश सेल्सियस पर्यंत जाईल असा अंदाज तुळजापूर येथील जिल्हा कृषि हवामान केंद्रामार्फत वर्तविण्यात आला आहे.
प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त अंदाजानुसार पुढील पाच दिवसात तापमान ४३ अंश सेल्सियस चा पारा ओलांडेल असे संकेत दिले आहेत. जिल्ह्यातील भूम, कळंब व वाशी तालुक्यात तापमानाचा पारा ४३ अंश सेल्सियसच्या पुढे तर उस्मानाबाद, उमरगा, तुळजापूर, लोहारा व परंडा तालुक्यामध्ये कमाल तापमान ४० ते ४२ अंश सेल्सियस दरम्यान राहण्याची शक्यता तुळजापूर येथील जिल्हा कृषि हवामान केंद्राने दिली आहे.
तसेच शेतातील उभ्या पिकांना, भाजीपाला व फळबागांना शक्यतो सकाळी किंवा सायंकाळी पाणी द्यावे. तसेच बाष्पीभवणामुळे होणाऱ्या पाण्याचा ऱ्हास टाळण्यासाठी फळबागांमध्ये अच्छादनांचा वापर करावा. शेतकरी बांधवानी उष्माघाताचा त्रास टाळण्यासाठी शेतीची व इतर कष्टाची कामे शक्यतो सकाळी व सायंकाळीच करण्याचे अवाहन जिल्हा कृषि हवामान केंद्राचे हवामान तज्ञ डॉ. नकुल हरवाडीकर यांनी केले आहे.
उष्माघाताचा त्रास टाळण्यासाठी :- साधे पाणी, लिंबू पाणी, नारळ पाणी, कैरीची पन्हे, इत्यादीचे भरपूर प्रमाणात सेवन करावे. शक्यतो दुपारी १ ते ४ पर्यंत बाहेर जाणे टाळावे परंतू, शक्य नसल्यास गॉगल, टोपी रुमाल, छत्रीचा वापर करावा. तसेच उच्च प्रथिनयुक्त आहार (मासे, मांस, अंडी), तेलकट, मसालेदार आहाराचा समावेश टाळावा व “क” जीवनसत्व युक्त फळाचा आहारामध्ये समावेश करावा. पाणी पिणे टाळावे शक्य असल्यास दिवसातून दोन वेळेस अंघोळ करावी. अशक्तपणा व थकवा जाणवत असल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेण्याचे अवाहन कृषि विज्ञान केंद्र, तुळजापूरच्या गृहविज्ञान शास्त्रज्ञ प्रा. वर्षा मरवाळीकर यांनी केले आहे.