आघाडीचा चौथा उमेदवार चांगल्या मतांनी विजयी होईल - ना. जयंत पाटील

0

आघाडीचा चौथा उमेदवार चांगल्या मतांनी विजयी होईल - ना. जयंत पाटील

महाविकास आघाडी अडचणीत नाही. महाविकास आघाडीकडे बहुमत आहे, त्यामुळे आघाडीचा चौथा उमेदवार चांगल्या मतांनी विजयी होईल, अशी खात्री राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व जलसंपदा मंत्री ना. जयंत पाटील यांनी व्यक्त केली.

आज आदरणीय खा. शरद पवार साहेब यांच्यासोबत यशवंतराव चव्हाण सेंटर इथे झालेल्या बैठकीनंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. 

विधानसभेच्या सर्व सदस्यांना महाविकास आघाडीकडून सूचना गेल्या आहेत. बहुसंख्य आमदार मुंबईत दाखल झाले आहेत, त्या सर्वांसाठी ही बैठक होती, असेही जयंत पाटील यांनी सांगितले.

अपक्षांशी विविध स्तरावर चर्चा सुरू आहे. योग्यवेळी माध्यमांना याबाबत माहिती दिली जाईल. वेगवेगळ्या कारणांनी वेगवेगळ्या वेळी लोकांची नाराजी होत असते परंतु समाजवादी पक्ष हा उत्तर प्रदेशमध्ये भाजपविरोधी राहिलेला आहे आणि त्यांचा मूलाधार तोच आहे. त्यामुळे पक्ष महाविकास आघाडी सरकारला पाठिंबा देईल, अशी खात्रीही जयंत पाटील यांनी व्यक्त केली.

सध्या कोरोनाची साथ आहे. कोरोनामुळे सर्व आमदार हे मुंबईत असावेत आणि मतदानासाठी उपलब्ध असावेत अशी भूमिका आहे. मतं तर दाखवूनच द्यायची असतात त्यामुळे कुणी कुणाला पळवण्याचा प्रश्नच येत नाही, असेही जयंत पाटील म्हणाले.

मोर्चेबांधणीचा प्रयत्न भाजप करणारच. या निवडणुका बिनविरोध व्हायला हव्या होत्या. जो उमेदवार निवडणूक रिंगणात आहे तो मतं मिळवण्यासाठी प्रयत्न करणारच, त्यात दोष देण्याची गरज नाही. पण मुळातच महाविकास आघाडी सरकारला सुरुवातीला १७० आमदारांनी पाठिंबा दिलेला होता. त्यामुळे सर्व उमेदवार निवडून येतील असा विश्वास जयंत पाटील यांनी व्यक्त केला.

दरम्यान, विधान परिषदेसाठी चर्चा सुरू असून दोन जागा आमच्या असून या दोन जागांसाठी चर्चा सुरू आहे. त्याचा योग्यवेळी निर्णय जाहीर करु, असेही जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.
#RajyaSabhaElection2022

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top