शिक्षक दिन आणि आजचे वास्तव , विशेष लेख
प्रा.डॉ.तुळशीराम उकिरडे
मो.क्र. 9881103941
भारताला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष झाली. आपण मोठ्या आनंदामध्ये भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहोत ,ही सर्वांसाठी आनंददायक बाब आहे .परंतु हे सर्व करत असताना हा देश उभा करण्यासाठी अहोरात्र कष्ट करणारे , श्रम करणारे , अनेक विभूती ,तत्वज्ञ ,शास्त्रज्ञ समाजामध्ये पाहावयास मिळतात. त्यांचे योगदान विसरून चालणार नाही. आज पाच सप्टेंबर म्हणजेच डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिन शिक्षक दिन म्हणून सर्व भारतभर साजरा केला जात आहे.
डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्म दक्षिण भारतात तामिळनाडू मधील तिरुत्तनी या ठिकाणी 5 सप्टेंबर 1888 मध्ये झाला. त्यांचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी सुरुवातीस सहाय्यक प्राध्यापक आणि नंतर प्राध्यापक म्हणून अनुक्रमे मद्रास प्रेसिडेन्सी कॉलेज आणि म्हैसूर विद्यापीठामध्ये १९१८ ते १९२१ च्या दरम्यान काम केले. म्हैसूर विद्यापीठाने राधाकृष्णन यांचा तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक म्हणून गौरव केला.
१९२१ - १९३१ या दरम्यान कोलकत्ता विद्यापीठाने त्यांना तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक म्हणून नियुक्त केले. डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन १९३१ - १९३६ मध्ये आंध्र विद्यापीठाचे कुलगुरू झाले. १९३९ मध्ये पंडित मदन मोहन मालवियांच्या विनंतीवरून त्यांनी बनारस विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून सूत्र हाती घेतले. ते १९४८ पर्यंत बनारस विद्यापीठाचे कुलगुरू राहिले. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन हे स्वतंत्र भारताचे पहिले उपराष्ट्रपती होते. १३ मे १९५२ ते १२ मे १९६२ पर्यंत ते उपराष्ट्रपती राहिले. भारताने १९५४ साली त्यांना 'भारतरत्न' हा किताब देऊन त्यांचा गौरव केला.
तसेच ते स्वतंत्र भारताचे दुसरे राष्ट्रपती (१३ मे १९६२ ते १३ मे १९६७) होते.
त्यांनी संस्कृत भाषेचा अभ्यास करून प्रस्थानत्रयी आणि समग्र भाष्यग्रंथ अभ्यासले. पश्चिमेकडचे तत्त्वज्ञानातील प्लेटो, प्लॉटनिस, कान्ट, ब्रॅडले यांच्यासारख्या तत्त्वज्ञांच्या ग्रंथांचा त्यांनी अभ्यास केला. त्याचप्रमाणे इंग्रजी साहित्यातील शेक्सपिअर, कोलारीज, ब्राउनिंग, वॊल्ट विटमन इत्यादी साहित्यिकांच्या लेखन शैलीचा त्यांनी अभ्यास केला. तसेच गटे, डानटे, होमर यांसारख्या महाकवींची काव्यसृष्टी अनुभवली. त्यामुळे एक परिपूर्ण शिक्षक म्हणून संपूर्ण जगाने डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा गौरव केला.
डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन हे स्वतः एक उत्तम शिक्षक असल्यामुळे त्या पेशाबद्दल वाटणारे प्रेम आणि त्यासाठी केलेले ४० वर्षांचे कार्य यांचा सन्मान करण्यासाठी भारत सरकारने ५ सप्टेंबर हा त्यांचा जन्मदिवस 'शिक्षकदिन' म्हणून साजरा करण्याचे जाहीर केले.चांगल्या शिक्षकांचा सन्मान हा संस्कृतीचा, सत्याचा व ज्ञानाचा सन्मान आहे. समाजाचा विकास सत्तेने होत नाही, यंत्राने होत नाही तर तो आदर्श शिक्षकांमुळे होत असतो. शिक्षकांचे महत्त्व असाधरण आहे हे जाणल्याशिवाय आपण प्रगती करू शकत नाही. शिक्षक म्हणजे काय? तर 'शि' म्हणजे शिलवान, 'क्ष' म्हणजे क्षमाक्षील आणि 'क' म्हणजे कर्तव्यदक्ष . असे शिक्षक या शब्दाचे महानत्व स्पष्ट करता येईल .
5 सप्टेंबर हा शिक्षक दिन म्हणून साजरा करत असताना , आजच्या वर्तमान काळामधील शिक्षक आणि शिक्षण यावर भाष्य करणे महत्त्वाचे ठरते. देशाच्या विकासामध्ये प्रत्येक व्यक्तीचा वाटा असतो. त्यामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रातील कर्तृत्ववान व्यक्ती देशहितासाठी अहोरात्र कार्य करत असतात. शिक्षणातून मानवी जीवनाची प्रगती होते.समाज सुसंस्कृत बनतो. समाजाला एक नवी दिशा मिळत असते. ज्ञानदानाचे अविरतपणे कार्य करणारे शिक्षक, समाजाला योग्य दिशा देणारे शिक्षकच, सुसंस्कारित पिढी घडवणारे शिक्षकच, नवनिर्मितीचा ध्यास असणारे शिक्षकच,नाविन्याचा शोध घेणारे शिक्षकच. व्यक्तीच्या जीवनात आई हा पहिला गुरू, त्यानंतर ज्यांना समाजात मानाचे, आदराचे स्थान आहे, ते शिक्षकच.
"गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु साक्षात परब्रम्ह महेश्वरा " असे गुरूंना म्हटले जाते. प्राचीन काळापासून गुरु विषयीची आदराची भावना प्रत्येकाच्या मनामध्ये अविरतपणे रुजलेली पहावयास मिळते. वर्तमानकाळात शिक्षण पध्दतीत आमूलाग्र बदल झाला. आज काळ बदलला .मूल्यसंस्कृतीचा ऱ्हास होताना आपण पहातोय . आई, वडील, शिक्षकांविषयीची आदराची भावना काळाबरोबर लुप्त होत चालली. जागतिकीकरण, संगणकीय युग आणि त्यामध्ये नैतिक मूल्यांचा ऱ्हास कधी होत गेला हे कळलंच नाही. आज युवक व्यसनाधीन झालेला पहावयास मिळतो . मोबाईल एक व्यसनच. आधुनिक काळाची पावले ओळखत असताना विकासाच्या वाटेवर वाटचाल करणारा हा आजचा युवक . युवकांच्या बळावर भारत महासत्तेच्या दिशेने वाटचाल करणार असा आशावाद व्यक्त करणारे भारताचे माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम .
हजारो प्रश्न आजही अवतीभवती गिरक्या मारत आहेत. त्या प्रश्नातून एक वेगळी वाट दाखवणारा शिक्षकच . आज त्याविषयी भारतभर नव्हे तर जगभर गुणगौरव करताना दिसून येतील . महाराष्ट्रामध्ये शालेय स्तरावर अनुदानित - विनाअनुदानित हा भेदाभेद . शिक्षकही अनुदानित , विना अनुदानितचा बळी. आयुष्याची 20 -25 वर्षे विनाअनुदानित धोरणात ज्ञानदानात घालवायची. उपाशीपोटी तत्वज्ञान द्यायचं कसं? रोजीरोटीचा सवाल कायमचा समोर. तो सोडवता येतच नाही, हे वास्तव नाकारून चालणार नाही. ज्ञानदान हेच सर्वश्रेष्ठ दान आणि अविरत मनोभावे अध्यापनाची सेवा करणारा शिक्षकच. कुटुंबाला पोसता येईल एवढे उत्पन्न नाही, तरीही विद्यार्थ्यांची ज्ञानाच्या माध्यमातून मनोभावे सेवा करणारा . वर्तमान काळात अनेक गावांमध्ये मास्तर हा चेष्टेचा आणि कुचेष्टेचा विषय झालेला दिसून येतो. कारण काय? डी.एड. ,बी.एड. ,करून हाती काहीच नाही. गुरुजी म्हणून गावात ओळख. पूर्वी गुरुजी म्हटलं की आदर ,मान-सन्मान, अभिमान असायचा .आज बिनपगारी गुरुजी हा व्यवस्थेने तयार केलेला आत्मघातकी विषय . कर्जबाजारीपणा, उपासमार, बेरोजगारी वाट्याला. विनाअनुदानित तत्त्वावर चालणाऱ्या शाळेमध्ये गुरुजींची अवस्था तर अधिकच बिकटच. किती दिवस आशेवर जगायचं ?पण पर्याय काहीच नाही. धीर सोडून कसं चालेल. कारण सहनशीलता, चिकाटी हे गुण मुळातच त्याच्या ठायी रुजलेले. हे सगळं सहन करत असताना आर्थिक अडचणी सोसत असताना, अविरतपणे सुसंस्कृत पिढी घडवण्यासाठी , समाज सुसंस्कृत करण्यासाठी दिवस रात्र कष्ट करत असणारा ,ज्ञानदान करणारा शिक्षकच. ध्येयवादी पिढी घडवणारे शिक्षकच. त्याच्या वाटेला आलेले दिवस बदलतील ही आशा.
आज भारताने सर्व क्षेत्रांमध्ये अमुलाग्र बदल केलेला आहे. जगात नावलौकिक मिळवला.अनेक तत्ववेत्ते घडवले. ज्ञान- विज्ञान -संगणक- तंत्रज्ञान -औद्योगिक- कृषी इ.क्षेत्रात आमूलाग्र बदल झाला. शिक्षकांचे योगदान आपल्याला विसरता येणार नाही. अखंडपणे अध्यापनाचे कार्य करत असताना, ज्ञानदानाचे कार्य करत असताना महासत्ताक भारत उभा करण्याचा, नवी सक्षम पिढी उभी करण्याचे काम शिक्षकांनी केलं आणि आजही करताहेत. त्यातूनच देशाचा झालेला कायापालट दिसून येतो .आज प्रचंड प्रमाणामध्ये साक्षरतेचे प्रमाण वाढले असले तरी शिक्षणापासून वंचित असणारी मुलं आपल्याला अवतीभोवती पाहायला मिळतात. आदिवासी पाड्यांमध्ये नोकरी करत असताना आलेले अनुभव आणि त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना घडवण्यासाठी शिक्षकाने केलेल्या वेगवेगळ्या उपाययोजना आपल्याला पहावयास मिळतात.
ग्रामीण भागामध्ये अपुऱ्या सोयी सुविधामुळे मुलं शाळेमध्ये येत नाहीत. आदिवासी पाड्यांमध्ये मुलांना शाळा म्हणजे नकोशी वाटायला लागते. आज शिक्षणाचे सार्वत्रिकरण झाले .परंतु जागतिकरण, बाजारीकरण, चंगळवादी जीवनशैलीत वाढ झाली. याचा परिणाम शिक्षण व्यवस्थेवर झालेला दिसून येतो. आज निरोगी आयुष्य ही संकल्पना नष्ट होत आहे . वडीलधाऱ्यांच्या मान मर्यादा आजही मुले राखताना दिसत नाहीत. शिक्षकांचा वचक नाहीसा झाला आहे. विद्यार्थी सैराटसारखे वागू लागलेले दिसून येतात . भारतीय संस्कृती ही जगामध्ये श्रेष्ठ आहे, याची जपणूक सर्वांनी केली पाहिजे. 'गुरु ब्रह्मा गुरुर विष्णु 'असे आपण म्हणतो . परंतु त्याचे आपण पालन करत नाहीत, हे धोक्याची वेळ आलेली आहे .सर्वांनी वेळीच सावध व्हायला हवे . चिंतन करायला हवे.
शिक्षकांनी विद्यार्थी हेच दैवत समजून मानवतेने सेवा करायला हवी. प्राथमिक शिक्षणाविषयीच्या शासन स्तरावर वेगवेगळ्या योजना राबविल्या जातात .कोणीही शिक्षणापासून वंचित राहू नये ,यासाठी प्रयत्न केले जातात .14 वर्षे वयोगटापर्यंतचा मुलांना शिक्षणासाठी सरकारने ' मोफत आणि सक्तीचा शिक्षणाचा कायदा ' केला . कोणी शिक्षणापासून वंचित राहणार नाही , याची शासन स्तरावर दखल घेतली जाते .आज गल्लोगल्ली शाळा निघाल्या . कोचिंग क्लासेस मोठ्या प्रमाणावर चालत आहेत . पालकांचा मुलांना घडविण्याचा उत्साह मोठा आनंददायी दिसून येतो आहे . असे असले तरी भारतामध्ये गरीब श्रीमंत - दरी मोठी आहे, हे विसरून चालत नाही . गरिबांच्या मुलांसाठी सवलतीच्या माध्यमातून शिक्षण योजना राबवल्या जातात . आज श्रीमंताची मुले लाखो रुपये भरून मोठमोठ्या शाळा- महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेत असलेले आपण पाहत आहोत . एका बाजूला जगण्यासाठी संघर्ष ,खायची आबाळ तर फी कोठून भरायची? त्यातून शिक्षण कसं घ्यायचं कसं? ही मोठी समस्या भेडसावत आहे .
राजर्षी शाहू महाराज, महात्मा फुले , क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, गोपाळ गणेश आगरकर, महर्षी कर्वे ,कर्मवीर भाऊ पाटील ,विठ्ठलराव रामजी शिंदे , पंजाबराव देशमुख यांनी शिक्षण हे मानवाच्या उन्नतीचे साधन आहे, हे समाजात बिंबवले . त्याची प्रचिती आज पावलोपावली येत आहे. महात्मा फुले शिक्षणाविषयी म्हणतात,
"विद्याविना मती गेली
मतीविना नीती गेली
नितीविना गती गेली
गती विना वित्त गेले
इतके अनर्थ
एका अविद्येने केले"
शिक्षणाचा सहसंबंध मानवाच्या जगण्याशी आहे, उन्नतीशी आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, 'शिका संघटित व्हा संघर्ष करा 'हा संदेश ते समग्र मानव जातीला देतात. आज शासन शिक्षणावर मोठ्या प्रमाणात खर्च करत आहे. पटसंख्या वाढविण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.परंतु आज भारतामध्ये 18 ते 23 या तरुण वयोगटातील युवकांचे उच्च शिक्षणातील प्रवेशाचे प्रमाण ग्रॉस एनरोलमेंट रेशो 2015 च्या अधिकृत आकडेवारीनुसार 21.14 टक्के आहे .म्हणजेच आजही भारतातील 18 ते 23 वयोगटातील 79 टक्के युवकांना गरिबी व सामाजिक दुस्थितीमुळे उच्च शिक्षणाची संधी मिळत नाही, हे स्पष्ट होते .
ज्या आदिवासी क्षेत्रामध्ये निसर्गच त्यांचा सखा सोबती आहे, त्यांना शिकवायचं कसं? भले शाळेत प्रवेश घेतला तर नियमित उपस्थित राहायचं कसं ?ही मोठी समस्या आहे .दारिद्र्य पाचवीला पुजलेलं असतं. उजाडला दिवस राना वनात फळ कंदमूळ शोधणे ,वन्य प्राण्यांची शिकार करणे, त्यातून जीवन जगणे . हाच एकमेव पर्याय .मोठ्या फी भरण्याची कशा ? गुरुजींच्या कार्याची ओळख करून देताना गुरुजी म्हटले की आपल्यासमोर आपण लहान असतानाचे गुरुजी आठवतात. पांढरे शुभ्र कपडे, रस्त्याने चालताना गुरुजी समोर आले तर वाट वाकडी करणारा विद्यार्थी. त्यांच्यासमोर जायचे नाही . घरोघरी जाऊन प्रत्येक विद्यार्थ्यांना शाळेत या म्हणणारे गुरुजी .शिक्षणाविषयी तळमळ असणारे. वर्गात छडी असायची. मुले म्हणायची 'छडी लागे छम ,छम विद्या येई घमघम '.शिक्षकाचा धाक असायचा .आज विद्यार्थ्यांना रागवायचे नाही . काही विचारायचं नाही. छडी हद्दपार झाली. शिक्षण पद्धती तीच ,पण गुरुजी बदलले. विद्यार्थी बदलले .शिक्षण क्षेत्राला बाजारीकरणाने घेरलं.
असे असले तरी आशावाद ठेऊ. शिक्षणाशिवाय विकास नाही. शिक्षकांशिवाय शिक्षण नाही .नवा भारत घडवण्यासाठी एकजुटीने प्रयत्न करू. कोणी शिक्षणापासून वंचित राहणार नाही याची काळजी घेऊ. असा कोणी जगामध्ये तत्ववेत्ता नाही ज्याला गुरू नाही.गुरुशिवाय ज्ञान नाही. शिक्षक दिनानिमित्त सर्व गुरुजनांना प्रणाम करतो. सर्वांना शिक्षक दिनाच्या शुभेच्छा देतो.