ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूका संदर्भात मतदारांना काही अडचण असल्यास संपर्क साधावा- अविनाश कोरडे
उस्मानाबाद,दि.14(जिमाका):- महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाचे सचिव यांच्या आदेशान्वये माहे ऑक्टोबर 2022 ते डिसेंबर 2022 या कालावधीमध्ये मुदती संपणाऱ्या ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूकांसाठी निवडणूक कार्यक्रम दि.09 नोव्हेंबर 2022 रोजी जाहीर केला आहे.
या निवडणूक कार्यक्रमानुसार उस्मानाबाद (45), तुळजापूर (48), उमरगा (23), लोहारा (13), कळंब (30), वाशी (4), भूम (2) आणि परंडा (1) या तालुक्यातील अशा एकूण 166 ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूकीची कार्यवाही सुरु आहे.
या निवडणूकीच्या अनुषंगाने लातूरचे अपर जिल्हाधिकारी तथा उस्मानाबादचे निवडणूक निरीक्षक ग्रामपंचायत अरविंद लोखंडे यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायत निवडणूक संदर्भात दि.13 डिसेंबर 2022 रोजी उस्मानाबाद जिल्हाधिकारी कार्यालय येथे महसूल अधिकारी आणि पोलिस अधिकारी यांची बैठक घेण्यात आली आहे.
सर्व उपविभागीय अधिकारी महसूल आणि पोलिस विभाग यांनी बैठका घेवून संवेदनशील आणि अतिसंवेदनशील मतदान केंद्रे निश्चित करुन त्याबाबत प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात. पोलिस बंदोबस्त प्लॅन तयार करतांना जाणे-येणे सोईस्कर होईल याचा विचार करुन प्लॅन तयार करण्यात यावा. मद्य, पैसे वाटप आदी तक्रारीच्या अनुषंगाने सर्व तहसील कार्यालयाच्या स्तरावर भरारी पथके नेमण्यात यावेत. मतदान केंद्रामध्ये मतदारांना मोबाईल बंदी असल्याबाबत संबंधितास अवगत करावे. आवश्यक कर्मचारी वर्ग उपलब्ध आहे किंवा कसे याबाबत सर्व तहसीलदार यांनी खातरजमा करावी. निवडणूकीसाठी नियुक्त अधिकारी, कर्मचारी यांना आवश्यक सर्व प्रशिक्षण देण्यात यावे. मतमोजणीच्या अनुषंगाने सर्व तहसीलदार आणि पोलिस निरीक्षक यांनी बैठक घेवून योग्य ते पूर्व नियोजन करावे, अशा सूचना श्री.लोखंडे यांनी यावेळी दिल्या आहेत.
ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2022 च्या अनुषंगाने जिल्ह्यातील मतदारांना काही सूचना किंवा निर्देश द्यावयाचे असल्यास लातूर अपर जिल्हाधिकारी तथा निवडणूक निरीक्षक ग्रामपंचायत श्री. लोखंडे यांचा 9511762369 या भ्रमणध्वनी क्रमांकावर पाठविण्यात यावेत, असे आवाहन सामान्य प्रशासनचे उपजिल्हाधिकारी अविनाश कोरडे यांनी केले आहे.