प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेच्या आयुष्यमान कार्ड वाटप शिबीराचे आयोजन

0


प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेच्या आयुष्यमान कार्ड वाटप शिबीराचे आयोजन

 

       उस्मानाबाद,दि.17(जिमाका):- उस्मानाबाद जिल्ह्यातील शहरी भागात आयुष्मान कार्ड ई-केवायसीचे  प्रमाण अत्यल्प असल्याचे  निदर्शनास आल्यानुसार  आयुष्मान कार्ड ई-केवायसी 100 टक्के करून घेण्याकरिता नगरपंचायात, नगरपालिका, नगरपरिषद स्तरावर संबंधित मुख्याधिकारी यांनी वॉर्ड निहाय जनजागृती मोहीम आयोजित करून आयुष्मान कार्ड ई-केवायसी 100 टक्के करून घेण्याकरिता पात्र लाभार्थी यांना ज्या ठिकाणी आशा कार्यकर्त्या आहेत, त्यांच्याद्वारे घरोघरी जाऊन आयुष्मान कार्ड ई-केवायसी करून घेण्याकरिता प्रवृत्त  करावे.  ज्या ठिकाणी आशा कार्यकर्त्या नाहीत अशा शहरी भागात नगरपरिषद, नगरपंचायत कर्मचारी यांच्याद्वारे पात्र लाभार्थ्यांना ई-केवायसी करण्याकरिता पृवत्त करणे  तसेच  आयुषमान भारत अंतर्गत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचे आयुष्यमान कार्ड ई-केवायसी 100 टक्के पूर्ण करण्याकरिता दि. 23 ते 25 जानेवारी 2023 या दरम्यान शहरी भागात प्रभाग निहाय  शिबीर (Camp ) आयोजित करावे आणि  या कामाकरीता प्रभाग निहाय  नोडल अधिकारी याची नेमणूक करण्यात यावी. तसेच आशा कार्यकर्त्या आणि नगरपरिषद कर्मचारी  यांच्या मार्फत आयुष्मान कार्ड ई-केवायसी न झालेल्या सर्व लाभार्थ्यांना आपले सरकार सेवा केंद्र, सीएससी केंद्रापर्यंत घेऊन येण्यास पृवत्त करण्याबाबत  सर्व मुख्याधिकारी नगरपरिषद, नगरपंचायत जिल्हा यांना सूचना दिल्या आहेत.

            तसेच प्रत्येक आशा यांना आयुष्मान भारत योजने अंतर्गत 200 पात्र कुटुंबाची जबाबदारी मुख्याधिकारी यांनी निश्चित करून द्यावी आणि ज्या ठिकाणी आशा पात्र लाभार्थी कुटुंबाचे आयुष्मान कार्ड ई-केवायसी करण्याकरिता लाभार्थ्यांना सीएसओ केन्द्र आणि आपले सरकार सेवा केंद्रापर्यंत घेऊन जाण्यास मदत करतील अशा आशाना प्रती लाभार्थी 20 रुपये मानधन देण्यासंदर्भात नगरपरिषद, नगरपंचायत स्तरावरून योग्य कार्यवाही करावी. अद्याप पर्यंत आशा कार्यकर्त्या यांच्या मदतीने ज्या लाभार्थ्यांच्या आयुष्मान कार्ड ई-केवायसी मंजूर (approved) करण्यात आलेल्या आहेत, त्यानुसार प्रती लाभार्थी 20 रुपये याप्रमाणे मानधन अदा करण्याकरिता नगरपरिषद, नगरपंचायत स्तरावरून योग्य ती कार्यवाही करून तसा अहवाल या कार्यालयास सादर करावा.

            कॅम्प कालावधी नंतर ज्या लाभार्थ्यांचे आयुष्मान कार्ड ई-केवायसी करावयाचे बाकी आहे, अशा पात्र लाभार्थ्यांच्या घरोघरी जाऊन 50 लाभार्थी प्रतीदिन याप्रमाणे नियोजन करून 500 किंवा 500 पेक्षा कमी लाभार्थी असणाऱ्या वार्डातील 10 दिवसाच्या आत 100 टक्के ई-केवायसी करून घ्यावे आणि नगरपरिषद, नगरपंचायत निहाय  तसा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयास  पाठवावा. तसेच ज्या वार्डातील ई-केवायसी न झालेली पात्र लाभार्थी संख्या 500 पेक्षा जास्त आहे, अशा ठिकाणी प्रतीदिन 50 ई-केवायसी या प्रमाणे नियोजन करून दिलेल्या कालावधीच्या दुसऱ्या दिवशी नगरपरिषद, नगरपंचायत निहाय सर्व माहिती choosmanabad@gmail.com    या मेल वर पाठवण्यात यावी. तसेच आयुष्मान कार्ड ई-केवायसी करण्यास तयार नसलेल्या सर्व लाभार्थ्यांच्या नावासहीत, ई-केवायसी न करण्याच्या कारणांसहीत लाभार्थ्यांची स्वाक्षरी घेऊन सर्व माहिती कॅम्प अहवाल प्रपत्र 3 मधील नमुन्यात कॅम्प कालावधी नंतर तात्काळ या कार्यालयास सादर करण्यात यावी. आशाच्या कामाचा अहवाल नगरपरिषद, नगरपंचायत स्तरावर नोडल अधिकारी यांनी आशा यांच्या नावासह सीएससी केंद्र चालक यांच्याद्वारे एकत्रित मुख्याधिकारी यांच्याकडे संकलित करावा. चुकीच्या नोंदी किंवा याद्या प्रमाणित करून दिल्यास संबंधित सीएससी केंद्र चालक यांच्यावर कार्यवाही करण्यात येईल याची नोंद घ्यावी. तसेच केलेल्या कामाचा अहवाल प्रपत्र 1 मधील नमुन्यात नगरपरिषद, नगरपालिका, नगरपंचायत निहाय एकत्रित रोजच्या रोज या कार्यालयास पाठवण्यात यावा. तसेच 100 टक्के ई-केवायसी पूर्ण झाल्यानंतर प्रपत्र 2 मध्ये सर्व माहिती पाठवावी.

            आयुषमान भारत अंतर्गत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचे आयुष्यमान कार्ड 100 टक्के वाटप करण्याकामी ही  प्रक्रिया यशस्वीपणे राबविण्यासाठीच्या सूचना जिल्हा सह आयुक्त, नगरपरिषद प्रशासन विभाग,जि.प.चे जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्य चिकीत्सक आणि   सर्व नगरपरिषद, नगरपंचायत मुख्याधिकारी यांना देण्यात  आल्या आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top