उद्योग संचालनालय विभागांतर्गत विविध वैयक्तिक लाभाच्या योजनेसाठी अर्ज करण्याचे जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओम्बासे यांचे आवाहन

0

उद्योग संचालनालय विभागांतर्गत विविध वैयक्तिक लाभाच्या योजनेसाठी
 अर्ज करण्याचे जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओम्बासे यांचे आवाहन

 

               उस्मानाबाद,दि.16(जिमाका): राज्याच्या शहरी, ग्रामीण भागातील सुशिक्षित बेरोजगार युवकांसह दुग्धउत्पादक, खवा उत्पादक, पशुपालक आणि शेतकरी बांधवांना स्वयंरोजगाराची साधन उपलब्ध करून देत त्याला शाश्वत अर्थार्जनाचा पर्याय उपलब्ध करून देणाऱ्या उद्योग संचालनालय महाराष्ट्र शासन विभागाने विविध योजना आणि उपक्रमाद्वारे शहरी, ग्रामीण महाराष्ट्राचे अर्थचक्र गतिमान ठेवण्याचा नेहमीच प्रयत्न केला आहे.

                विविध योजना आणि उपक्रमाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील दूध उत्पादक, खवा उत्पादक, पशुपालक आणि शेतकरी बांधवांना स्वयंरोजगाराची साधनं उपलब्ध करून देण्यासाठी कटिबद्ध असलेल्या महाराष्ट्र शासनाच्या उद्योग संचालनालय विभागाच्या वतीने वैयक्तिक लाभाच्या योजना अंतर्गत पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम (PMEGP) आणि मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम (CMEGP) विविध उत्पादन प्रक्रिया असलेले उद्योग जसे मिल्क प्रॉडक्ट, खवा निर्मिती, इत्यादी राबविण्यात येत आहेत.

              या दोन्ही योजनेचा लाभ घेण्याकरिता जास्तीत जास्त प्रकल्प किंमत 50 लाख रुपये असून आर्थिक मदतीचे स्वरूप पुढीलप्रमाणे आहे. सर्वसाधारण प्रवर्गसाठी स्वगुंतवणूक प्रकल्प किंमतीच्या मर्यादेत 10 टक्के, बँक कर्ज 90 टक्के, ग्रामीण भागासाठी अनुदान 25 टक्के आणि शहरी भागासाठी अनुदान 15 टक्के आहे. तसेच राखीव प्रवर्ग एस.सी., एस.टी., ओबीसी, महिला, व्हीजेएनटी, एन.टी., माजी सैनिक, अपंग, अल्पसंख्यांक आदींसाठी स्वगुंतवणूक प्रकल्प किंमतीच्या मर्यादेत 5 टक्के, बँक कर्ज 95 टक्के, ग्रामीण भासाठी अनुदान 35 टक्के आणि शहरी भागासाठी अनुदान 25 टक्के आहे.

              सर्वसाधारणपणे या योजनेचा लाभ घेण्याकरिता सर्वसाधारण प्रवर्गातील अर्जदाराचे वय 18 ते 45 वर्ष आणि राखीव प्रवर्गातील अर्जदाराचे वय 18 ते 50 वर्ष असावे. तसेच प्रकल्प किंमत 10 लाख रुपयांपेक्षा जास्त असल्यास किमान शैक्षणिक पात्रता 7 वी पास असणे आवश्यक आहे आणि प्रकल्प किंमत 25 लाख रुपयांपेक्षा जास्त असल्यास किमान शैक्षणिक पात्रता 10 वी पास असणे आवश्यक आहे.

            या योजनांचा लाभ घेण्यासाठी आपले गाव दत्तक असलेल्या राष्ट्रीयकृत बँकेस web-http://mahacmegp.gov.in या संकेत स्थळावर अर्ज करावा. ऑनलाइन अर्ज भरण्याचे संकेतस्थळ- web-http://maha-cmegp.gov.in तसेच CMEGP Cell Mumbai- 18602332028 आणि ईमेल- maha.cmegp@gmail.com याप्रमाणे आहे. ऑनलाइन अर्ज भरण्याचे संकेतस्थळ www.kviconline.gov.in आणि हेल्पलाईन क्रमांक 022-26711017 असा आहे.

            या योजनेच्या माध्यमातून स्वयंरोजगार सुरू करून आपल्या जिल्ह्याच्या विकासात योगदान द्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओम्बासे, महाव्यवस्थापक जिल्हा उद्योग केंद्र आणि जिल्हा दुग्धव्यवसाय विकास अधिकारी यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top