औरंगाबाद, उस्मानाबाद नामांतरविरोधी याचिकांवर उच्च न्यायालयात 15 फेब्रुवारीला सुनावणी , हरकती न मागवता नामांतर कसे केले? न्यायमूर्तींचा सवाल
उस्मानाबाद -
औरंगाबाद व उस्मानाबाद शहराच्या नामांतर प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर आज (दि.31) झालेल्या सुनावणीत न्या.गंगापूरवाला व न्या.मारणे यांनी हरकती न मागवता नामांतराचा निर्णय कसा झाला? कार्यालयीन कार्यवाही झालेली नसताना बदलेले नाव कसे वापरता? असे फटकारत 15 फेब्रुवारीपर्यंत याचा खुलासा करावा, असे निर्देश दिले. या प्रकरणात पुढील सुनावणी 15 फेब्रुवारी रोजी ठेवण्यात आली असल्याची माहिती याचिकाकर्त्यांच्या वतीने देण्यात आली आहे.
औरंगाबाद व उस्मानाबाद नामांतर प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयात दाखल झालेल्या जनहित याचिकांवर मंगळवारी न्या.गंगापूरवाला व न्या.मारणे यांच्यासमोर सुनावणी ठेवण्यात आली होती. उस्मानाबाद नामांतराविरोधात मोहम्मद मुश्ताक अहमद चाऊस (क्र.93/2022), मसूद शेख (क्र.173/2022) खलील सय्यद (क्र.110/2022) यांच्यासह इतर 19 जणांच्या याचिका दाखल आहेत. त्यांच्या वतीने अॅड. प्रज्ञा सतीश तळेकर यांनी बाजू मांडली. तर औरंगाबाद नामांतर प्रकरणात याचिकाकर्त्यांच्या वतीने अॅड. युसुफ मुचाला यांनी बाजू मांडली. याची पुढील सुनावणी 15 फेब्रुवारी रोजी ठेवण्यात आली असल्याची माहिती याचिकाकर्ते खलील सय्यद यांनी दिली.