खेड ता.उस्मानाबाद येथे बळीराजा दुध संकलन व शितकरण केंद्राचे शुभारंभ अर्चनाताई राणाजगजितसिंह पाटील यांच्याहस्ते करण्यात आले. सदरील डेअरी हि शर्मिलाताई माकोडे व कल्पनाताई खराडे या उमेद बचत गटातील दोन महिलांनी भारत सरकार राष्ट्रीय डेअरी विकास बोर्ड (मदर डेअरी) अंतर्गत पुढाकार घेवून व परिसरातील दुधाला योग्य दर मिळावा यासाठी सुरु केली आहे. या केंद्राचा खेड व परिसरातील आळणी, कौडगाव, बावी, खामगाव आदी गावातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.
या प्रसंगी बोलतानाअर्चनाताई पाटील यांनी कौतुकास्पद उपक्रमाचे कौतुक करून महिलांनी पुढाकार घेवून भागभांडवल जमा करून सदर प्रकल्प सुरु केला आहे. विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी शेतीला जोडधंदा म्हणून दूध व्यवसाय करावा यासाठी मदर डेअरीचे प्रयत्न सुरु आहेत. या माध्यमातून मदर डेअरीचे जिल्हाभरात कार्य सुरु असून दूध संकलन व शीतकरण केंद्राची व्याप्ती वाढत असून त्यामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांना जास्तीचा भाव मिळत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील इतर गावातही बचत गटातील महिलांनी असे केंद्र सुरु करून स्वावलंबी बनावे व योग्य नियोजन करून प्रकल्पाची क्षमता व संख्या देखील वाढवावी, असे आवाहन केले.
यावेळी गावातील जेष्ठ नेते श्री.लिंबराज टिकले गुरुजी, मदर डेअरी कळंब केंद्राचे इन्चार्ज अभिजित सुरवसे, जिल्हा दूध विकास अधिकारी राहुल ठोंबरे, पशु धन विकास अधिकारी डॉ.स्वप्नील जिंतपुरे, विभागिय अधिकारी धर्मेंद्र ठाकूर, कळंब विभागीय अधिकारी संदीप क्षीरसागर, स्टेट बँकचे ढोकी शाखा अधिकारी अभय टिचकुले, डॉ.शरद लाकाळ पशु वैद्यकीय अधिकारी उपळा (मा), सौ.सविता रामेश्वर टकले सीएलएफ मॅनेजर उमेद, सौ.साधना ज्ञानोबा गरड सीआरपी उमेद खेड, सौ.विजया परमेश्वर गरड सीआरपी उमेद खेड यांच्यासह परिसरातील प्रमुख कार्यकर्ते, दूध उत्पादक शेतकरी व बचत गटातील महिला उपस्थित होत्या.