राज्यातील गुटखा, पान मसाला पुर्णपणे विक्रीस खुला करण्याची पॅंथर सेनेची मागणी
उस्मानाबाद दि.१२ (प्रतिनिधी) - राज्यात अवैध मार्गाने गुटखा, पान मसाला विक्री करण्यासाठी शासनाने बंदी घातलेली आहे. मात्र गुटखा व पान मसाला अव्वाच्या सव्वा दराने खुले आमपणे विक्री केली जात आहे. त्या माध्यमातून ग्राहकांची मोठ्या प्रमाणात आर्थिक लूट केली जात आहे. त्यामुळे ही होणारी लूट थांबविण्यासाठी राज्यात गुटखा व पान मसाला आधी पदार्थ विकण्यास परवानगी देण्यात यावी अशी मागणी ऑल इंडिया पँथर सेनेच्यावतीने एका निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
दिलेल्या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की, २०१२ मध्ये ३२८ कलमावरुन महाराष्ट्र शासनाने प्रतिबंदीत केलेला गुटखा व पानमसाला यांची आजतागायत छुप्या पध्दतीने हप्ता देऊन विक्री केला जात आहे. त्यामुळे कायदा व सुव्यवस्था पायादळी तुडवली जात असून यास शासनाने विक्री करण्यासाठी बंदी केल्यामुळे महसुल बुडत आहे. तर शेजारील राज्याच्या ज्या ठिकाणावरुन आपल्या राज्यामध्ये गुटखा व पानमसाला छुप्या पध्दतीने आयात केला जातो. त्यामुळे त्या राज्याचा महसुल वाढत असून सुध्दा नवीन अधिकारी ज्या-ज्या ठिकाणी नियुक्त होतात. तसेच ज्यांच्या नियंत्रणामध्ये हे सर्वकाही चालते ते नियुक्त झाल्यानंतर हप्ता कमी दिल्यामुळे छोट्या पाणटपरीधारक व्यावसायिकांना त्रास द्यायला सुरुवात करतात. त्यांच्याकडून हप्ता स्वरुपात लाखो रुपायांची बेनामी वसुली करतात. त्यामुळे अशा अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करुन त्यांना निलंबित करण्यात यावे. तसेच राज्यातील वाढती बेरोजगारी लक्षात घेता व छोट्या व्यावसायिकांना होणारा त्रास व शासनाचा करोडो रुपयांचा बुडत असलेला महसुल लक्षात घेता शासनाने गुटखा विक्रीस कायदेशीर परवानगी देऊन विक्रीस खुले करण्यात यावे. तसेच हिंदु धर्मानुसार गाईला माता मानले जात असल्यामुळे गोमांस खाण्यास राज्यात बंदी आहे. कारण धार्मिक भावना दुखावल्या जाऊ नयेत यासाठी ही बंदी आहे. तर मुस्लिम धर्मामध्ये दारु निषिध्द आहे. त्यामुळे मुस्लिम बांधवांच्या भावना लक्षात घेऊन राज्यात पुर्णपणे दारुबंदी करण्यात यावी. तसेच शासनाच्यावतीने गुटखा व पानमसाला विक्रीस कायदेशीर परवानगी देता येत नसेल तर राज्यामध्ये मानवी शरीराला व जिविताला धोका होणाऱ्या सर्व वस्तु कायम स्वरुपी बंद करण्यात याव्यात. विशेष म्हणजे राज्यात वाढती बेरोजगारी असल्यामुळे युवा पिढी व्यसनाधीनतेकडे वळली आहे. ऑनलाईन जुगार याकडे वळली आहे. यामध्ये रम्मी, लुडो, तीनपत्ती, अशा ऑनलाईन जुगारांना बळी पडून आयुष्य उध्वस्त करुन घेत आहेत. हे ऑनलाईन जुगार पुर्णपणे नकली असून त्यामध्ये तरुणांसह सर्वांची मोठ्या प्रमाणावर फसवणूक होत आहे. हा ऑनलाईन जुगार राज्यातुन पुर्णपणे बंद करण्यात यावा व ऑनलाईन जुगाराची जाहिरात करणारे सिने अभिनेते व अभिनेत्री यांच्यावर कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी. या मागण्या मान्य न केल्यास येत्या १५ दिवसात ऑल इंडिया पँथर सेनेच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर लाखोंच्या संख्येने निषेध मोर्चा काढण्यात येईल असा इशारा दिला आहे. यावर ऑल इंडिया पॅंथर सेनेचे जिल्हाध्यक्ष धनंजय हुंबे, ग्रामीण जिल्हाध्यक्ष अशोक कसबे व जिल्हा प्रवक्ते समीर तांबोळी यांच्या सह्या आहेत.