विमा कंपनीच्या अध्यक्षांना अवमानाची नोटीस काढून न्यायालयात हजर राहण्याचे मा.सर्वोच्च न्यायालयाचे आदेश

0

विमा कंपनीच्या अध्यक्षांना अवमानाची नोटीस काढून न्यायालयात हजर राहण्याचे मा.सर्वोच्च न्यायालयाचे आदेश 

उस्मानाबाद :  खरीप २०२० पीक विम्याबाबत दाखल अवमान याचिकेवर आज झालेल्या सुनावणीमध्ये मा.सर्वोच्च न्यायालयाने शेतकऱ्यांबाबत अनुकूल भूमिका दर्शविली असून बजाज इन्शूरन्स जनरल अलायन्स कंपनीच्या अध्यक्षांना अवमानाची नोटीस काढून पुढील सुनावणीला हजर राहण्याचे आदेश दिले असल्याची माहिती आ.राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली आहे. 
मा.उच्च न्यायालयाने उस्मानाबाद जिल्ह्यातील ३,५७,२८७ शेतकऱ्यांना ६ आठवड्यात नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले होते. मात्र या निर्णयाविरोधात विमा कंपनीने मा. सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. तेथेही आपण कॅव्हीएट दाखल करून शेतकऱ्यांची बाजू उत्तम प्रकारे मांडल्याने मा.सर्वोच्च न्यायालयाने मा.उच्च न्यायालयाचा निर्णय सार्थ ठरवत जिल्हाधिकारी यांच्या देखरेखीखाली व निर्देशाप्रमाणे तीन आठवड्यात शेतकऱ्यांना अनुज्ञेय नुकसान भरपाई रक्कम वितरित करण्याचे आदेश दिले. 

परंतु विमा कंपनीकडून मा.सर्वोच्च न्यायालयात जमा केलेले रुपये २०० कोटी व त्यावरील व्याज एवढीच रक्कम जिल्हा प्रशासनाकडे प्राप्त झाली. जिल्हाधिकारी यांनी आवश्यक वाढीव रक्कम जमा करण्याचे विमा कंपनीला आदेश दिले, मात्र या आदेशाचे पालन विमा कंपनीकडून झाले नाही. शेतकऱ्यांना त्यांची हक्काची नुकसान भरपाई देण्यास विमा कंपनी टाळाटाळ करत आहे, ही बाब लक्षात घेऊन भारतीय जनता पार्टी युवामोर्चा तालुकाध्यक्ष प्रशांत लोमटे यांच्या माध्यमातून मा.सर्वोच्च न्यायालयात अवमान याचिका दाखल करण्यात आली. 
आ.राणाजगजितसिंह पाटील काल पासून वरिष्ठ विधिज्ञांशी विचार विनिमय करण्यासाठी दिल्लीत आहेत. याचिका कर्त्यांचे वकील ॲड.सुधांशू चौधरी व राज्य सरकारच्या वतीने ॲड.सिध्दार्थ धर्माधिकारी यांनी आजच्या सुनावणीमध्ये उत्तम प्रकारे युक्तीवाद केला. सुनावणीमध्ये मा.उच्च न्यायालयाचा ३,५७,२८७ शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याचा निर्णय स्वयंस्पष्ट असल्याचे मा.सर्वोच्च न्यायालयाने नमूद केले. शेतकऱ्यांना न्याय नुकसान भरपाई मिळाली पाहिजे याबाबत मा.न्यायालयाचा अगदी सकारात्मक दृष्टीकोन आजच्या सुनावणीमध्ये दिसून आला. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर विमा कंपनीचे अध्यक्षांना अवमान नोटीस काढून न्यायालयात हजर राहण्याचे मा.सर्वोच्च न्यायालयाने आज झालेल्या सुनावणीमध्ये आदेश दिले आहेत. पुढील सुनावणी चार आठवड्यानंतर ठेवण्यात आली आहे. 
सुनावणी दरम्यान झालेल्या चर्चेच्या अनुषंगाने विमा कंपनी जिल्हाधिकारी उस्मानाबाद यांच्या समवेत चर्चा करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई वितरीत करेल अशी अपेक्षा आ.राणाजगजितसिंह पाटील यांनी व्यक्त केली आहे. सुनावणी दरम्यान आ.राणाजगजितसिंह पाटील यांच्यासह ॲड.राजदीप राऊत देखील उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top